लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पोर्ट्रेट तयार करीत असताना चित्रकार आणि समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये एक मूकसंवादही होतो. त्या संवादाची साक्ष देताना तयार झालेली ती चित्रकृती असते, असे विचार ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी येथे मांडले.पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शनिवारी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे चौथ्या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ चित्रकार विजय आचरेकर व अब्दुल गफार उपस्थित होते.पोर्ट्रेट काढताना चित्रकार जितक्या तटस्थेने व प्रेमाने चित्र काढतो, तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने समोर बसलेली व्यक्ती प्रतिसाद देत असते. समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्र काढणे म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपल्या चित्रातून व्यक्त करणे असते, असे मत व्यक्त करीत कामत यांनी, रिप्रेझेंटेशनल पेंटिंगच्या आधारे पोर्ट्रेट या संकल्पनेला किती वेगवेगळे आयाम देता येतील व किती वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करता येतील याचा विचार मांडला. या उपक्रमाची मर्यादा मुंबईपुरती ठेवायची नाही. महाराष्ट्रात व वेगवेगळ्या प्रांतामध्ये ही चळवळ पोहचावयास हवी. हे कार्य उभे करताना आधार लागतोच. पाठिंबा हवा असतो, तो विजयबाबू दर्डा यांच्याकडून मिळतो, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे यांनी केले. स्पर्धेविषयीची माहिती शरद तावडे यांनी दिली. संचालन प्रा. सदानंद चौधरी यांनी केले. चित्रकार अजय पाटील, प्रकाश घाडगे, विजय काकडे, दिलीप भालेराव, प्रकाश बेतावर, सुनील पुराणिक, किरण पराते, रमेश सालोडकर, प्रा. बावर आदी विद्यार्थी उपस्थित होते.स्पर्धेची सुरुवात कामत व आचरेकर यांच्या प्रात्याक्षिकाने झाली. आयोजनासाठी दिनेश लोहकरे, रमेश सालोडकर, किरण पराते, अभिषेक आचार्य, केतन राणे, मधू मिश्रा, विशाल सोरटे, स्वप्नील रामगडे, महेश अटाळकर, सदानंद पचारे, मनोज सकळे, साहिल हजारे आदींनी सहकार्य केले.
पोर्ट्रेट म्हणजे हुबेहूब चित्र काढणे नव्हे : वासुदेव कामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:58 PM
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पोर्ट्रेट तयार करीत असताना चित्रकार आणि समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये एक मूकसंवादही होतो. त्या संवादाची साक्ष देताना तयार झालेली ती चित्रकृती असते, असे विचार ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी येथे मांडले.
ठळक मुद्दे ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेला सुरुवात