कुही : कुही तालुक्यात गत दोन दिवसापासून ऑनलाईन धान्य वितरण करण्याची पॉस मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रेशन दुकानदार त्रस्त आहेत तर, नागरिकही धान्य घेण्यापासून वंचित राहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात १० ते १५ तारखेपर्यंत असाच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने मोफत धान्य वितरणात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. नोव्हेंबरचे धान्य दुकानात उशिरा पोहोचल्याने बऱ्याच दुकानात धान्य वितरण उशिरा सुरू झाले. त्यामुळे महिना संपल्यावरही धान्य वाटपाची मुदत ६ डिसेंबरपर्यंत वाढवून दिल्या गेली. मात्र ५ आणि ६ डिसेंबरला पॉस मशीन बंद राहिल्याने तालुक्यातील जवळपास ४० टक्के दुकानदारांचे धान्य वितरण शिल्लक राहिलेले आहे. तेव्हा नोव्हेंबरचे धान्य वितरण करण्याकरिता अजून दोन ते तीन दिवसाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. अन्यथा दुकानदारांना पुढील महिन्यात धान्यसाठा कमी होऊन त्रास सहन करावा लागेल व कार्डधारक लाभार्थीसुद्धा धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेशन दुकानातील पॉस मशीन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:08 AM