लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधितांमध्ये मध्यम, उच्च-मध्यम वगार्तील रुग्णांचाच अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनाचे हॉटस्पॉट सतरंजीपुरा, मोमीनपुरा, नाईक तलाव अशा दाट लोकवस्तीच्या भागात निर्माण झाले होते. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा इमारती, बंगले अशा सधन भागाकडे प्रवास सुरू आहे. सध्या शहरात जे हॉटस्पॉट व प्रतिबंधित क्षेत्रे आहेत, ती सर्वच्या सर्व इमारतींमधील आहेत. झोपडपट्टीतील क्षेत्राचा समावेश नाही.
कोरोना हा संसर्गजन्य आजार. निष्काळजीपणामुळे तो कधीही, कुठेही आणि कोणालाही गाठू शकतो. गरीब-श्रीमंत असा भेद त्याच्या ठायी नाही. असे असले तरी कोरोनाच्या दैनंदिन अहवालात हा विरोधाभास मात्र ठळकपणे दिसत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसाला २ हजारांवर रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासोबतच नागरिकांचीही चिंता वाढली आहे. होम आयसोलेशनमध्ये १० हजाराहून अधिक रुग्ण आहेत. अधिक रुग्ण असलेल्या वस्त्या हॉटस्पॉट घोषित केल्या जात आहेत.
शहरात ३५ हॉटस्पॉट
खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जाफरनगर, एलआयसी कॉलनी धंतोली, नरेंद्रनगर, रेल्वे कॉलनी यासह जवळपास ३५ हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्या भागात कोरोना संक्रमण सर्वाधिक होते अशा भागात यावेळी संक्रमण दिसत नाही.
अॅन्टिबॉडी डेव्हलप झाल्याने कोरोनाचे क्षेत्र बदलले
संतरंजीपुरा, मोमीनपुरा या भागातील नागरिकांत ६० ते ६५ टक्के अॅन्टिबॉडी डेव्हलप झाल्या आहेत. त्या तुलनेत पॉश व मध्यमवर्गींयांची वस्ती असलेल्या भागात ४० टक्केच्या आसपास अॅन्टीबॉडी निर्माण होण्याचे प्रमाण आहे. यामुळे गेल्या वर्षी सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या सतरंजीपुरा, मोमीनपुरा भागात यावेळी रुग्ण दिसत नसल्याचे महापालिकेचे निरीक्षण आहे.
डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी मनपा