नागपूर : देशाच्या आर्थिक विकासात लघु उद्योजकांचे ९० टक्के योगदान आहे. याच क्षेत्रातून देशात १२ कोटी नोकऱ्या खासगी क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राला वाव मिळण्यासोबतच महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सहकार भारतीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय महिला अधिवेशनाचा समारोप रविवारी दुपारी झाला. व्यासपीठावर सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य होते. राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, राष्ट्रीय महिला प्रमुख शताब्दी पांडे, स्मॉल स्केल इंडस्ट्रिजचे प्रशांत पार्लेवार प्रमुख पाहुणे होते.
गडकरी म्हणाले, या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने योजना आखल्या आहेत. देशातील नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये नव्याने पाच कोटींची वाढ करणे आणि ग्रामीण उद्योजकांची उलाढाल एक कोटीवर नेण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील बचत गटांच्या निर्मित वस्तूंचे वेगळेपण असले तरी डिझाईन मात्र तेच ते आहे. गुणवत्ता, वक्तशीरपणा आणि पॅकेजिंगकडे देशातील ग्रामीण उद्योजकांना लक्ष द्यावे लागेल. नवे तंत्रज्ञान शोधा, उद्यमशीलता वाढवा. गाव, देश समृद्ध करू शकतील, एवढी ताकद बचत गटांमध्ये आहे. ती ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.
रमेश वैद्य म्हणाले, ग्रामीण क्षेत्रात काम होणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. समाजाचे चित्र पालटण्याची ताकद महिलांमध्ये आहे. २६ राज्यांतील १२०० महिला प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित होत्या.