विनोद तावडे : ‘आयटीआय’च्या मुद्यावर घेणार केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट नागपूर : ‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात केंद्रीय कामगार मंत्र्याशी भेट घेण्यात येईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिले. आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना व शिक्षणसंस्थांना कसलीही अपेक्षित पूर्वसूचना न देता नकारात्मक गुण पद्धत अवलंबिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत रामहरी रुपनवर,शरद रणपिसे आदी सदस्यांनी उपस्थित केली. यावर तावडे यांनी सांगितले की, जानेवारी-फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘आयटीआय’ च्या प्रथम सत्र परीक्षा ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्किंग सिस्टिम) प्रणालीद्वारे घेण्यात आली व त्याचे मूल्यांकन ‘डीजीईटी’ (डायरेक्टोरेट जनरल आॅफ एम्प्लॉयमेन्ट ट्रेनिंग), नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आले. त्यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना १० ‘ग्रेस’ गुण देण्यात आले होते व उत्तीर्णांची टक्केवारी ९१ टक्के इतकी होती.नकारात्मक गुणपद्धती लागू केल्यानंतर सर्वच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आॅगस्टमध्ये झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेत उत्तीर्णांची टक्केवारी ५१.४७ टक्क्यांवर घसरली. या प्रणालीत बदल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा आहे. सदर बाब ही राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राज्यात ४१७ ‘आयटीआय’दरम्यान, राज्यात आजच्या तारखेत ४१७ शासकीय ‘आयटीआय’ असून याची प्रवेशक्षमता सुमारे एक लाख इतकी आहे. तर ४१२ अशासकीय ‘आयटीआय’ची प्रवेशक्षमता २८ हजार आहे अशी माहिती तावडे यांनी दिली.
नकारात्मक गुणपद्धतीच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका
By admin | Published: December 16, 2014 1:08 AM