नागपूर : नागपूर जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आहे, पण ते ऑक्सिजन भरून कोरोना रुग्णांना देण्याकरिता रिकाम्या सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ही बाब गंभीरतेने घेऊन स्टील उद्याेग, फॅब्रिकेशन उद्याेग, वेल्डिंग दुकाने यांच्यासह इतरांकडील ऑक्सिजन सिलिंडर तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच, यासाठी गरज भासल्यास स्थानिक पोलीस व राज्य राखीव पोलीस बलाची मदत घेण्याची सूचना केली.
न्यायालयात कोरोनासंदर्भात तीन जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर, ॲड. तुषार मंडलेकर, डॉ. अनुप मरार यांच्यासह इतरांनी रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूरमधील ऑक्सिजन रिफिलिंग युनिट्सकडे २० हजार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती दिली. यापैकी ९ हजार सिलिंडर एकाच वेळी कोरोना रुग्णालयांमध्ये असतात आणि ९ हजार सिलिंडरमध्ये एकाच वेळी ऑक्सिजन भरण्याची प्रक्रिया सुरू असते, असेही त्यांनी सांगितले. परंतु, त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरची टंचाई नसती, तर याविषयी तक्रारच केली गेली नसती, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यावर उपाय करण्यासाठी स्टील उद्याेग, फॅब्रिकेशन उद्याेग, वेल्डिंग दुकाने आदींकडील रिकामे ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली. संबंधितांकडे सुमारे ४३०० ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे सांगण्यात आले. तसेच, रेल्वेकडे ३० सिलिंडर निरुपयोगी पडले असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना सदर आदेश दिला. या प्रकरणावर आता २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.
-------------
भंडाऱ्यातील स्टील प्लॅन्टला ऑक्सिजन मागा
भंडारा येथील सनफ्लॅग आयरन स्टील कंपनीकडे ऑक्सिजनची मागणी करावी, असे निर्देश न्यायालयाने नागपूर विभागीय आयुक्तांना दिले. विभागीय आयुक्तांनी ऑक्सिजन देण्याची विनंती केल्यास कंपनी त्यांना नकार देणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे, असे न्यायालय पुढे म्हणाले. ॲड. आदित्य गोयल यांनी याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्यात भंडारा, ठाणे, पुणे व डोलवी (जि. अलिबाग) या चार शहरांतील स्टील प्लॅन्टमध्ये ऑक्सिजन निर्माण केले जाते. त्यांना मागणी केल्यास ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघेल, असे गोयल यांनी न्यायालयाला सांगितले.
--------------
शनिवारी येणार ऑक्सिजनचे पाच टँकर
शनिवारी सकाळी प्रत्येकी २० मेट्रिक टनचे ५ ऑक्सिजन टँकर नागपुरात येणार आहेत, अशी माहिती सरकारी वकील ॲड. दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला दिली. भिलाई येथील स्टील प्लॅन्टकडून २१, २२ व २३ एप्रिल रोजी नागपूरला एकूण १६५ मेट्रिक टन ऑक्सिजन पाठविण्यात आले. तसेच, शुक्रवारी सायंकाळी विझाग येथून रेल्वेने तीन टँकर आणण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाने यावर समाधान व्यक्त करून कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची वर्तमान गरज यामुळे पूर्ण होईल, असे नमूद केले.
--------------
आढावा बैठक घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील ११ कंट्रोलिंग अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून कोरोना रुग्णालयांना होत असलेला ऑक्सिजन पुरवठा व मागणी याचा आढावा घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, असे सांगितले.
--------------
मेयो, मेडिकल, एम्स येथे ऑक्सिजन प्लॅन्ट
मेयो, मेडिकल व एम्स येथे एअर सेपरेशन टेक्नॉलॉजीवर आधारित ऑक्सिजन प्लॅट उभारण्यासाठी वेकोलिला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास लगेच काम सुरू करून ६ ते ८ आठवड्यांत हे प्लॅन्ट कार्यान्वित केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली.