नागपूर : शहराची शान समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्व संकटात आहे. शहरातील लहान-मोठे दहा तलाव आहेत. यातील काहींची स्थिती चिंताजनक झाली आहे. तर काही तलावांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यात पाणी साचलेले नाही. एकाही तलावाचे पाणी पिण्यायोग्य नाही. या तलावांना वेळीच प्रदूषणापासून वाचविण्यात आले नाही तर शहरात एकही तलाव उरणार नाही, असे चित्र आहे. तलावांची सफाई व पुनरुज्जीवनासाठी विविध प्रकल्प तयार करण्यात आले. राज्य सरकारतर्फे निधी जारी करण्यात आला. असे असले तरी स्थिती मात्र बदललेली नाही. जागतिक पृथ्वी दिनानिमित्त महापालिका, नासुप्रसोबतच नागरिकांनाही तलावांचे अस्तित्व वाचविण्यासाठी संकल्प करावा लागेल. महापालिका व स्वयंसेवी संस्थांतर्फे वेळोवेळी तलावांची स्वच्छता केली जाते. मात्र, तलावांची अंतर्गत सफाई व सौंदर्यीकरणावर पाहिजे त्या गंभीरतेने काम होताना दिसत नाही. फुटाळा तलावाला चौपाटीसारखे विकसित करण्यात आले. मात्र, परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. इतर तलावांचीही तशीच स्थिती आहे. गोरेवाडा तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. हा तलावदेखील प्रदूषण करणाऱ्यांपासून किती दिवस सुरक्षित राहील, हा एक मोठा चिंताजनक प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
कोट्यवधी खर्चूनही तलावांचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: April 22, 2017 3:02 AM