लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राखी पौर्णिमेला बहिणींनी पाठविलेल्या राखींची वाट बघणाऱ्या बंधूरायांच्या चेहऱ्यावर भारतीय पोस्टाच्या पोस्टमन्सनी हास्य फुलवले. एकाच दिवशी २० हजारावर राखींची डिलिव्हरी करत पोस्टमन्सनी आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली.
रक्षाबंधनाच्या पर्वावर देशभरात नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक कारणाने असलेल्या भगिनी नागपुरातील आपल्या भाऊरायाला राखी पाठवत असतात तर भाऊ देखील नागपुरातील आपल्या बहिणींनी राखीचा बोजारा गिफ्ट स्वरूपात पाठवत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी पर्यंत राखी व गिफ्ट पोहोचण्याची अपेक्षा असते आणि संबंधित भाऊ किंवा भगिनी वाट बघत असतात. बरेचदा ही अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मन निराश होतो. मात्र, भारतीय पोस्ट खात्याने दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीही राखी व गिफ्टची डिलिव्हरी पोहोचविण्याचा आदेश काढला होता. त्याला जागत नागपुरातील ३०० हून अधिक पोस्टमन्सनी एकाच दिवसात २० हजारावर राखी व गिफ्टची डिलिव्हरी संबंधितांपर्यंत पोहोचवली. हा आकडा आणखी वाढणार आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत ६८३६ स्पिडपोस्ट डिलिव्हरी तर १०,३७७ ऑर्डनरी मेल डिलिव्हरी पोहोचविण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत हे कार्य सुरूच होते. साधारणत: यात आणखी सहा हजार डिलिव्हरी वाढण्याची शक्यता नागपूर जीपीओच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-----
नेमक्या सुटीच्या दिवशी रक्षाबंधन आले. मात्र, या दिवशीही राखी पोहोचवायचीच असा कार्यालयीन आदेश होता. ते कार्य पोस्टमन्सनी पूर्ण केले. शहरात ६५ उपडाकघर आहेत. त्यातील २८ डाकघर रविवारी सुरू होते आणि त्यातून बुकिंगही सुरू ठेवण्यात आली होती. आणखी आठ दिवस हे कार्य सुरूच राहणार आहे.
- डॉ. वसुंधरा गुल्हाने, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नागपूर शहर
...................