लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील मानोरा गावाच्या शेतशिवारात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्या मृत्युभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. वाघाच्या शवविच्छेदनामध्ये सर्व अवयव सुरक्षित आढळले असल्याने आणि शरीराच्या डाव्या बाजूची हाडे मोडलेली आढळल्याने कसलाही ठोस अंदाज निघालेला नाही.
विशेष असे की, उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याची सीमा घटनास्थळापासून केवळ ३५० मीटर अंतरावर आहे. सुमारे ८ ते १० वर्षे वयाचा हा वाघ सोमवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान मानोरा शेत सर्व्हे क्रमांक १६ येथील महेश पोपटकर यांच्या शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळला होता. मंगळवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
या वाघाचे दात, चामडे, नखे आदी सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळले. एवढेच नाही, तर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्याही खुणा आढळल्या नाहीत. घटनास्थळावरून सुमारे २०० मीटर अंतरावर विद्युत लाईन आहे. यामुळे शिकार होण्याची शक्यता वनविभागाने धुडकावली आहे. मात्र, वाघाच्या शरीराच्या उजवीकडील रिब्स् बोन्स् डॅमेज झाल्याचे दिसून आले. यामुळे झुंजीमध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची शंकाही वनविभागाने व्यक्त केली आहे. नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार आहे.
दरम्यान, उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा, डीएफओ प्रीतमसिंह कोडापे, एसीएफ नरेंद्र चांदेवार, पीसीसीएफ व एनटीसीएचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, निखिल कातोरे यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लियाकत खान, डॉ. बिलाल अली, अविनाश लोंढे आदींच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, अग्नी देऊन अंत्यसंकार करण्यात आले.
संशयाचे वलय
वनविभागाने या वाघाच्या मृत्युसंदर्भात माध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमध्ये स्वत:च संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या पत्रकात वाघाचा मृत्यू एखाद्या विषाणूजन्य आजारानेही झालेला असून शकतो, तसेच सर्पदंशामुळेही मृत्यू झालेला असू शकतो, असाही संशय व्यक्त केला आहे. वर्षभरापूर्वी वाघांना बंगलोरमधील वाघांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर हाडा यांनी व्यक्त केलेली शंका अनेक चर्चांना वाव देणारी ठरली आहे.
जबाबदारी कुणाची?
एखादा वाघ वन्यजीव क्षेत्राबाहेर पडून प्रादेशिक परिसरात दाखल झाला असल्यास संबंधितक्षेत्रातील अधिकाऱ्यांना नोंदी घेऊन लक्ष ठेवावे लागते. ठेवावी लागते. या कामात व्याघ्र सुरक्षा दलामार्फत माहिती पुरविली जाते. सदर वाघाचे १६ नोव्हेंबरला कऱ्हांडला परिसरात अखेरचे दर्शन झाले होते. अभयारण्याच्या नजीकच्या परिसरात त्याचा वावर अधिक होता. शिवाय काही दिवसापूर्वी तास शिवारात गाईची शिकारसुद्धा केली होती. अशातच या वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्याही बाबी समोर येत आहेत. नेमकी जबाबदारी कुणाची, असाही प्रश्न वन्यप्रेमी विचारत आहेत.