नागपूर विभागात ५७ लाखांहून अधिक बचत खाते : देशभरातील ‘नेटवर्क’सोबत जोडणारनागपूर : नागरिकांच्या घरी पत्र पोहोचविणे हीच आता भारतीय टपाल खात्याची ओळख राहिलेली नाही. टपाल सेवेने ‘बँकिंग’ क्षेत्रातदेखील पदार्पण केले असून टपालघरांना ‘सीबीएस प्लॅटफॉर्म’वर (कोर बँकिंग सोल्युशन) आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत नागपूर विभागातील २३५ टपाल कार्यालयांना नवीन ‘प्लॅटफॉर्म’वर आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे विभागात ५७ लाखांहून अधिक बचत खाती असून त्यांना देशपातळीवरील ‘नेटवर्क’सोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच ‘बँकिंग प्लॅटफॉर्म’वर टपाल खात्याच्या गाडीने चांगलाच वेग पकडला आहे.देशातील सर्वात विश्वसनीय सेवा म्हणून आजही टपाल खात्याकडे पाहण्यात येते. बदलत्या काळानुसार टपाल विभागाने आपल्या सेवेत आमूलाग्र बदल केले. संदेश पोहोचविण्यासोबतच विभागांतर्गत बँकिंग, विमासारख्या सेवादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. २०१३ मध्ये नागपूर टपाल विभागाने सर्वच मुख्य टपाल कार्यालय तसेच उप-टपाल कार्यालयांना ‘सीबीएस प्लॅटफॉर्म’वर आणण्याची योजना सुरू केली. नागपूर विभागात पूर्व महाराष्ट्रातील ११ जिल्हे येतात. येथे १३ मुख्य टपाल कार्यालय, ३९० उप-टपाल कार्यालय व २ हजार ५३४ शाखा टपाल कार्यालय आहेत. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत यातील २३५ टपाल कार्यालयांना ‘सीबीएस प्लॅटफॉर्म’मध्ये बदलण्यात आले तर या आर्थिक वर्षात सर्वच उप-टपाल कार्यालयांना नवीन ‘प्लॅटफॉर्म’मध्ये बदलण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत नागपूर टपाल क्षेत्रात ५७ लाख २४ हजार ६८ बचत खाते होते. या सर्व खात्यांना देशातील दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांच्या ‘नेटवर्क’सोबत जोडण्यात येणार आहे. नागरिकांना त्यांच्या खात्यांतील देवाणघेवाणीची माहिती ‘एसएमएस’च्या माध्यमातूनदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.नागपूर विभागतील उपटपाल कार्यालयांमध्ये बचत खाते, पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, वरिष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी खाते इत्यादी बचत योजना सुरू आहेत. सोबतच ‘सीबीएस’ टपाल कार्यालयांमध्ये २०१५ साली पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचीदेखील सुरुवात करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
‘बँकिंग प्लॅटफॉर्म’वर टपाल खात्याची घौडदौड
By admin | Published: January 07, 2016 3:46 AM