लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिव्यांग व ८० वर्षाच्या वर वय असणाऱ्या मतदारांना ‘पोस्टल बॅलेट’ने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
ठाकरे यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यात जवळपाास २०० मतदार असे आहेत, ज्यांचे वय हे ८० वर्षापेक्षा अधिक आहे. तसेच दिव्यांग मतदारांची यादी तयाार केली जात आहे. या मतदारांना मतदान करण्यासाठी कुठलीही अडचण जाऊ नये म्हणून ‘पोस्टल बॅलेट’ची व्यवस्था करून देण्यात येत आहे. ज्या कुणाला ‘पोस्टल बॅलेटने मतदान करायचे आहे, त्यांनी १२ ‘ड’चा फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. हा फॉर्म प्रशासनातर्फे सर्व संबंधित मतदारांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फॉर्मसोबतच शपथपत्र जोडणेही आवश्यक आहे. याचीही व्यवस्था घरपोच केली जाईल. यासाठी नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग व ८० वर्षावरील ज्या मतदाराला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे आहे, ते मतदान केंद्रावर जाऊन सुद्धा मतदान करू शकतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात ७० टक्के मतदार शहरातील
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा नागपूर विभागात एकूण २ लाख ६ हजार मतदार आहेत. त्यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात १ लाख २ हजाार मतदार आहेत. यातही नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास ७० टक्के मतदार हे नागपूर शहरातील आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात एकूण १६२ मतदान केंद्र असून एकट्या शहरात १२४ मतदान केंद्र आहेत. तर जिल्ह्यात ३८ मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, लाईट, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे.
काम न करणाऱ्या बीएलओवर कारवाई
दिव्यांग व ८० वर्षावरील मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित बीएलओवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीदरम्यान बीएलओ व्यवस्थित काम करीत नाही, अशी तक्रार असते. यावेळी बीएलओवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. काम न करणाऱ्या बीएलओवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकरी ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पेन व मोबाईलवर बंदी, पसंतीक्रम आकड्यातच लिहावा
मतदान केंद्रावर पेन व मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना पेन व मोबाईल नेऊ नये, ते बाहेर काढून ठेवावे लागतील. मतदान केंद्रातील अधिकारी जो पेन देतील त्याचाच वापर करणे बंधनकारक आहे. तसेच मतदान करताना पसंतीक्रम लिहायचा आहे. तो पसंतीक्रम आकड्यातच लिहणे बंधनकारक आहे. तेही एक आकडा मराठीत एक इंग्रजीत एक रोमन असे चालणार नाही. कोणत्याही एकाच भाषेत आकडा असावा. वेगवेगळ्या भाषेत असू नये, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
सायबर सेलकडे दोन तक्रारी
निवडणूक प्रचारासंबंधी दोन तक्रारी आतापर्यंत मिळाल्या आहेत. या दोन्ही तक्रारी सायबर गुन्ह्यासंबंधी असून त्या सायबर सेलकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.