लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली आहे.लॉकडाऊनमध्ये दळणवळणाच्या अत्यावश्यक सुविधा बंद असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टातर्फे ' लॉकडाऊन ' मध्येही विशेष वाहनातून मुंबई व पुण्याचे टपाल जात आहे. बऱ्याच दिवसानंतर आता काही अंशी या सेवा सुरु झाल्या असल्या तरी त्याला मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत पोस्ट विभागाने रेल्वेसोबत टाय अप करीत ९ मेपासून ‘इंडिया रेल पोस्ट लॉजिस्टीक’ सेवा सुरु केली आहे. लॉकडाऊन मुळे देशातील विविध भागातून येणारे टपाल अडकून पडले होते. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून डाक विभागाच्याच वाहनातून टपाल वितरित करण्याचा पर्याय निवडला आहे. जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या पोस्टाच्या कार्यालयामध्ये दिवसभरात जमा झालेले टपाल रात्री पोस्टाच्या वाहनातून मुंबई व पुण्याला रवाना होत आहे. नागपूरहून विशेष वाहनाने मुंबई व पुण्याचे टपाल जात असून संबंधित मार्गावरील गावांचे टपालदेखील या वाहनातून पाठविले जात आहे. या वाहनातून टपाला व्यतिरिक्त औषधेदेखील पाठवण्यात येत आहेत.टपाल विभागाने नागपूर, मुंबई आणि पुणे या शहरात लॉजिस्टिक पोस्ट सेवा सुरू केली आहे. नागपूरच्या शेतकऱ्यांचा माल टपाल विभागाच्या मध्यस्तीने रेल्वेद्वारे मुंबई अथवा पुण्यात पोहचविला जात आहे. आता, किरकोळ व्यापाऱ्यांना आपला माल बुक करण्यासाठी कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. औषध, मदत साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक इत्यादी वस्तूंचे बुकिंग करुन या सेवेचा फायदा घेता येईल. लॉजिस्टिक सेवेमध्ये ग्राहक घरातूनच आपला माल इंटरनेटद्वारे बुक करू शकतील अथवा जवळच्या पोस्ट ऑफिसमधे जाऊनही बुकिंग करता येईल अशी माहिती विभागाने दिली.
औषध, भाज्या नेण्यासाठी पोस्टल सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:28 PM
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली आहे.
ठळक मुद्देइंडिया रेल पोस्ट लॉजिस्टीक सेवा : मुंबई, पुण्याचे टपाल पोहचविण्याची व्यवस्था