नागपूर : शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला जात असल्याचे चित्र आहे. नागपुरातील शिवसैनिक सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. परंतु शुक्रवारी महालातील चितारओळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून चारशे मीटरच्या आत येतो.
उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. नेत्यांच्या गैरहजेरीत नागपुरातील कार्यकर्ते रस्त्यावर आले. पक्षप्रमुखांना समर्थन करतानादेखील पक्षात गटबाजी दिसून आली. मात्र हे राजकीय वादळ सुरू झाल्यापासून नागपुरात कुणीही उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने वक्तव्य केले नव्हते किंवा तसे चित्रदेखील नव्हते.
परंतु शुक्रवारी सायंकाळी चितारओळ चौकात शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग’ लागले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे नेते असून, आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या या पावलासाठी त्यांना शुभेच्छा असा या ‘होर्डिंग’वर मजकूर आहे. वीर बजरंगी सेवा संस्थेतर्फे महेश झाडे पाटील यांनी हे होर्डिंग लावले आहे. त्यांचा शिवसेनेशी थेट संबंध आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही.