नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार समर्थकांनी पक्षाच्या गणेशपेठेतील कार्यालयातील अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांचे फोटो काढले होते. आता अजित पवार समर्थकांनी काचीपुरा परिसरातील जनसंपर्क कार्यालयात लागलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजीमंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचे फोटे काढले.
काचिपुरा येथील जनसंपर्क कार्यालय हे प्रशांत पवार यांचे कर्यालय आहे. पण ते राष्ट्रवादीत आल्यापासून त्यांच्या कार्यालयाला पक्ष कार्यालयाचे स्वरुप आले आहे. शनिवारी सकाळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विदर्भ प्रवक्ते प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी जि.प. सदस्य सतीश शिंदे, माजी सभापती नरेश अरसडे, ईश्वर बाळबुधे, अरविंद भाजीपाले, भोगेश्वर फेंडर, राजेश माटे, रवी पराते, पुंडलिक राऊत आदी शनिवारी जनसंपर्क कार्यालयात पोहचले. या कार्यालयात लागलेले जयंत पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, दुनेश्वर पेठे आदींचे फोटो काढण्यात आले. ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रशांत पवार यांनी सांगितले की, आते हे विदर्भाचे कार्यालय राहील. येथे तक्रार निवारण केंद्र सुरु केले जाईल व नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील. याशिवाय शहरात फिरती गाडीही सुरू केली जाईल.
देशमुखांमुळे बडतर्फ केले : गुजर
आपल्याला अनिल देशमुख यांच्यामुळे जिल्हाध्यक्षपदावरून बडतर्फ करण्यात आले, असा आरोप बाबा गुजर यांनी केली. पक्षात दुसरा कुणी मोठा होऊ द्यायचा नाही, असाच देशमुख यांचा प्रयत्न असून २० वर्षात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस का वाढली नाही, असा सवालही गुजर यांनी केला.
‘त्याच’ कार्यालयाचे उदघाटन अजित पवारही करणार
- काचीपुरा येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे २०२१ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. आता पुन्हा त्याच कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, केंद्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.