नागपूर : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा व्यवसायावर परिणाम झाला आहे, ही बाब ध्यानात ठेवून केंद्र सरकारने जीएसटी व आयकर तरतुदींच्या अंमलबजावणीची तारीख स्थगित करण्याची मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
जीएसटी आणि आयकरअंतर्गत एप्रिल महिन्यात व्यावसायिकांना तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे; पण लॉकडाऊनच्या काळात हे शक्य नाही. ‘कॅट’चे अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, कॅटने सीतारामन यांना पत्र पाठवून एप्रिल महिन्यात ११ प्रकारच्या जीएसटी तरतुदींचे पालन करण्याला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या तरतुदींचे पालन न केल्यास देशभरातील व्यापाऱ्यांकडून दंड आणि व्याज आकारण्यात येणार आहे. याशिवाय कॅटने एप्रिल महिन्यात आयकर संबंधित १५ प्रकारच्या तरतुदींना स्थगिती देण्याचे आवाहन केले आहे. असे न केल्यास व्यापाऱ्यांना लेट फी आणि व्याज द्यावे लागेल. त्यामुळे व्यापाऱ्यांवर वित्तीय बोजा वाढणार आहे. विविध प्रकारच्या प्रतिबंधांमुळे तरतुदींचे पालन करण्यात व्यावसायिकांना उशीर झाल्यास त्याला गुन्हा न समजता स्थिती सामान्य होईपर्यंत केवळ शुल्क व दंडाला किमान तीन महिने स्थगिती द्यावी, असे भरतीया म्हणाले.