लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी, मध्यमवर्ग व आर्थिकदृष्ट्या कमकुवत थकबाकीदारांची वीज कापण्याच्या मोहिमेला स्थगित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ‘कोरोना’चे वाढते आकडे लक्षात घेता, २४ फेब्रुवारीचे ‘जेल भरो’ आंदोलनदेखील रद्द केले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली.
याअगोदरच्या भाजप सरकारने पाच वर्ष थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली नाही. मात्र महाविकास आघाडी शासनाने ऐन हंगामात शेतकऱ्यांची वीज जोडणी कापण्याच्या मोहीम सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. अशास्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही मोहीम बंद करण्याचे निर्देश दिले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
२४ फेब्रुवारी रोजी भाजप कार्यकर्ते व नेते या मागणीसाठी राज्यातील ५५० जागी आंदोलन करणार होते. मात्र ‘कोरोना’च्या लढ्यात भाजप सरकारच्या पाठीशी असून त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु जर सरकारने ‘लॉकडाऊन’ काळातील वीज देयक माफ केले नाही व वीज जोडणी कापण्याची मोहीम थांबविली नाही तर ‘कोरोना’चा प्रकोप थांबताच भाजपचे ५० हजार कार्यकर्ते स्वत:ची अटक करवून घेतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, आ. समीर मेघे, जयप्रकाश गुप्ता, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, राम अंबुलकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते.