लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २४ मे पासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे. परंतु सध्या महाविद्यालये कोरोना निर्बंधांमुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर राहणार आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा पोस्टपोन करा असा महाविद्यालयांचा सूर आहे.
सद्यस्थितीत हिवाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या नेमक्या कधी होतील याबाबत काहीच स्पष्टता नाही. दुसरीकडे २४ मे पासून उन्हाळी परीक्षा घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. या परीक्षेकरिता १८ मेपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. मात्र, सध्या कोरोना स्थितीमुळे सगळीकडील शिक्षण संस्था पूर्णपणे बंद आहे. पोलिसांचा रस्त्यावर बंदोबस्त असून कर्मचाऱ्यांना महाविद्यालयामध्ये येता येत नाही. विद्यार्थ्यांना देखील अर्ज भरण्यात अडचणी जात आहेत. महाविद्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षांचे अर्ज १८ मे पर्यंत विद्याापीठाकडे जमा करणे अशक्य आहे. कर्मचारी नसताना हे अर्ज स्वीकारावयाचे कसे, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र घेण्याकरिता काॅलेजांमध्ये कसे बोलवायचे असे प्रश्न महाविद्याालयांसमोर आहेत.
प्राचार्य फोरमची देखील मागणी
दरम्यान, प्राचार्य फोरमने देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, असे प्राचार्य फोरमने म्हटले आहे. फोरमतर्फे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र देण्यात आले आहे.
अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलणार ?
विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु मे च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसीच्या परीक्षांबाबत काहीच निर्णय झालेला नाही. कोरोनाची स्थिती कायम राहिली तर त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.