जिल्हा मेळाव्यात घोषणा : जि.प. निवडणुकीचे आव्हान नागपूर : भाजपच्या जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी डॉ. राजीव पोतदार यांची रविवारी एकमताने फेरनिवड करण्यात आली. गेल्या तीन वर्षात पोतदार यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्ह्यात चांगली कामगिरी केली. त्या कामाचे फळ म्हणून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. पक्षसंघटनेसाठी झटणारे कार्यकर्ते अशी डॉ. पोतदार यांची ओळख आहे. वर्षभराने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे आव्हान डॉ. पोतदार यांना पेलावे लागणार आहे. शहर संघटनेत फेरबदल करीत आ. कृष्णा खोपडे यांच्यानंतर आ. सुधाकर कोहळे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षही बदलले जातील की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. पोतदार यांना यापूर्वी दोनदा आमदारकीच्या तिकिटाची हुलकावणी मिळाली. शेवटी जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली. रविवारी दुपारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा ग्रामीणची बैठक झाली. तीत जिल्हा निवडणूक अधिकारी खा. अशोक नेते यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली व डॉ. पोतदार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. गेल्या तीन वर्षात डॉ. पोतदार यांच्या नेतृत्वात भाजपने विधानसभा निवडणुकीसह लोकसभा, नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्येही चांगले यश मिळविले.
पोतदार पुन्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष
By admin | Published: January 18, 2016 2:41 AM