- गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रह करायला आष्टीच्या पोलीस ठाण्यावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या छातीवर इंग्रज पोलिसांनी गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ होऊन ते पडले होते. जमाव पोहोचला. म्हणाला, गेट उघडा, आम्हाला आत येऊन जखमी सोबत्यांना पाणी पाजायचे आहे. ठाणेदार मस्तावलेला होता. म्हणाला, ‘हम कुत्ते का मूत पिलायेंगे, वो शहीद नही, कुत्ते है..!’ क्रांतिकारी भडकले. ठाण्यात घुसले. पोलिसांना पळता भुई थोडी केली. तिघे जण तर ठाण्यात खाटेखाली लपून बसले. त्यांना हुडकून खाटेवर रॉकेलचे पिंप ओतले अन् त्या तिघांसह पोलीस ठाण्यालाच आग लावून दिली... ठाणेदाराचाही चेंदामेंदा केला !
काय झाले १६ ऑगस्टला?
१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. किव्हाया, अंतोरा, खंबीत, वडाळा आदी परिसरातील गावागावांत जाऊन या क्रांतिवीरांनी दप्तरे जाळली. १६ ऑगस्टला वडाळ्याचे १५० सत्याग्रही लेंडी नदीजवळ पोहचले. आष्टीचे तरुण त्यांना भेटले. ११ वाजता २०० वर सत्याग्रही आष्टीच्या गांधी चौकात गोळा झाले. झेंडा फडकवित ४०० जण पोलीस ठाण्यावर गेले. इन्स्पेक्टर मिश्रा याला फाटक उघडण्यास सांगितले. त्याने ४-५ जणांनाच येण्यास फर्मावले. मात्र एकापाठोपाठ सर्वच जण आत शिरले.
....आणि ठिणगी पडली
मिश्राने गोळीबारासाठी खुणावले. रामभाऊ लोहे छाती काढून गरजले, ‘त्यांना कशाला मारता, अरे मला मारा’, पोलिसांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ते घायाळ होऊन पडले. वडळा येथील पंछीगोंडला, उदेभान कुबळे, केशवराव ढोंगे, रशिदखॉ नबाब हे क्रांतिवीर सरसावले, त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या. ते धाराशाही झाले. खडकीचा १८ वर्षांचा तरुण हरिलाल गोळीला बळी पडला.