पुण्यप्रसून वाजपेयी : विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती नागपूर : आज प्रत्येकजण समानतेच्या केवळ गोष्टीच करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू करण्यापूर्वी सामाजिक व आर्थिक समानतेचे महत्त्व विषद केले होते. ते तत्त्वज्ञान जगासमोर येणे आवश्यक आहे. आज सर्वच राजकीय पक्ष त्यांच्याशी भावनिकतेने जोडू पाहतात. मात्र सत्ताकेंद्रित झालेली व्यवस्था डगमगेल या भीतीने त्यांचे विचार स्वीकारले व प्रकाशात येऊ दिले जात नाही, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी डॉ. आंबेडकरांद्वारे लिखित अनेक पुस्तक व त्यांच्या भाषणांचे दाखले दिले. ब्राह्मणी जात नसून ती एक व्यवस्था आहे, असे मानणारी व तिला मजबुतीने टक्कर देणारी ती एकमेव व्यक्ती होती. जगभरातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारेही ते एकमेव होते. देशात सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर लोकशाही फार काळ तग धरणार नाही. संपूर्ण व्यवस्था सत्ताकेंद्रित झाली तर देशातील सर्व संस्था मोडकळीस येतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते आणि दुर्देवाने त्यांचे खरे ठरताना दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. १९५२ पासून विविध पॅकेज देऊनही गरीब अधिक गरीब झाले व शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्याचा विचार दिला होता. त्यांना अधिकार दिल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारणार नाही, असे बाबासाहेबांनी सुचविले होते. मात्र सत्तेत राहणाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आज हिंदूराष्ट्राची त्वेषाने संकल्पना मांडली जाते. अशा अवस्थेत आपण विकसित देशांशी स्पर्धा कशी करणार, असा सवालही वाजपेयी यांनी यावेळी केला. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार, तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी यावेळी शिक्षण म्हणजे पदव्या घेणे नसून व्यवहार शिकणे होय. बाबासाहेबांनी संविधानात दिलेले स्वातंत्र्य आपण उपभोगतो, मात्र बंधुत्वाचा व्यवहार विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूरणचंद्र मेश्राम यांनी केले तर संचालन डॉ. प्रमोद शर्मा यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर... बाबासाहेबांना जातीय व्यवस्थेची चिड होती. त्याचप्रमाणे उद्योगजगताच्या भरवशावर चालणारे राजकारण त्यांना मान्य नव्हते. वर्तमान काळात उद्योजकांच्या भरवशावर निवडणुका लढविल्या जातात व जातीय समीकरण महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला असून गरीब अधिक गरीब होत आहे आणि राजकारण्यांची संपत्ती शेकडो पटीने वाढत आहे. बाबासाहेब पंतप्रधान असते तर त्यांनी सर्वात आधी व्यवस्थेवर प्रहार केला असता व आजच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप वेगळे असते. याच कारणामुळे ‘नेहरू ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर...’ असा विचार केला जातो, मात्र ‘बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर...’ हा विचार स्वीकारला किंवा चर्चा केली जात नाही, असे मत वाजपेयी यांनी व्यक्त केले.
सत्तेला बाबासाहेबांचे विचार स्वीकारण्याची भीती वाटते
By admin | Published: April 15, 2017 2:14 AM