लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरातील २०३ इमारतींना धोकादायक यादीत टाकण्यात आले आहे.. यातील १९२ इमारतधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मनपाने नोटीस बजावल्यानंतर निर्धारित कालावधीत इमारत खाली न केल्यास अशा इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील धोकादायक ९३ इमारती पाडण्यात आल्या आहेत. ७० इमारती पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. २३ इमारतीतील नागरिक इमारत खाली करण्यास तयार नाही. या इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.
जीर्ण इमारतींचे मालक इमारतीची दुरुस्ती केल्याचा दावा करतात. परंतु यात सत्यता नाही. सर्वाधिक ९७ जीर्ण इमारती गांधीबाग भागात आहेत. नेहरूनगर झोन क्षेत्रात ५० हून अधिक अशा इमारती आहेत.
मुंबई येथील दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व महापालिकांना जीर्ण इमारतींची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपाच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व झोन कार्यालयांना जीर्ण इमारतींचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. परंतु दहापैकी सात झोनने सर्व्हे केला. लक्ष्मीनगर, धरमपेठ व आशीनगर झोनने अद्याप सर्व्हेचा अहवाल सादर केलेला नाही. सादर केलेल्या अहवालानुसार मंगळवारी, नेहरूनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक जीर्ण इमारती आहेत.
....
काही प्रकरणे न्यायालयात
जीर्ण इमारतीसंदर्भात प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विभागीय कार्यालयांनी मालकांना जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात आहेत. काही प्रकरणे न्यालयालयात प्रलंबित आहे. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.