लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या भागातील वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास, ते दुरुस्ती किंवा बदली करण्याच्या कालावधीत तेथील वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.वितरण रोहित्र हा वीज यंत्रणेचा आत्मा असतो, यात काही बिघाड उद्भवल्यास या रोहित्रावरील ग्राहकांना ते दुरुस्त किंवा बदली होईपर्यंत अंधारात राहावे लागते, ग्राहकांचा हा त्रास लक्षात घेऊन महावितरणने ‘पॉवर आॅन व्हील’ची सुविधा काँग्रेसनगर विभागातील वीज ग्राहकांसाठी सरू केली असून या अंतर्गत वाहनावर ६३० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड आला, त्या ठिकाणी हे वाहन उभे करून तेथील नादुरुस्त रोहित्रांवरील ग्राहकांच्या वीज जोडण्या वाहनावरील रोहित्राला जोडण्यात येऊन तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरू करण्यात येऊन ग्राहकांना दिलासा दिल्या जात आहे.यादरम्यान नादुरुस्त रोहित्रातील बिघाड दूर करून अथवा नादुरुस्त रोहित्र बदली करेपर्यंत ग्राहकांना या ‘पॉवर आॅन व्हील’च्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी साधारणपणे ३-४ तासाचा कालावधी लागतो.या काळात वीज ग्राहकांना विजेशिवाय राहावे लागू नये यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’च्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू राहत असल्याने शहरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून या सुविधेमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाले आहे.
विदर्भातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हा उपक्रम राबवणारऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढकाराने महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ‘पॉवर आॅन व्हील’चा उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या सहकार्याने महावितरणच्या काँग्रेसनगर विभागात ‘पॉवर आॅन व्हील’चा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू झाला असून विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतून हा उपक्रम राबविण्याची तयारी महावितरणकडून करण्यात येत आहे.- दिलीप घुगल, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ