थकबाकीदारांची बत्ती गुल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात १५ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात थकबाकीदारांची वीज कापली जाणार नाही. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी
यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन असलेल्या भागात वीज कनेक्शन न कापण्याचे स्पष्ट नियम आहेत. या नियमांचे पालन केले जाईल. लॉकडाऊननंतर मात्र ही मोहीम पुन्हा सुरू केली जाईल. दरम्यान, या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी महावितरणने शहर सर्कलमधील ५७४ थकबाकीदारांची बत्ती गुल केली. सोमवारपासून लॉकडाऊन सुरू होत आहे. यात बहुतांश परिसर याच सर्कलमध्ये येतात. परंतु राज्यातील इतर भागांमध्ये ज्या ठिकाणी लॉकडाऊन लागू नाही, अशा ठिकाणी मात्र थकबाकीदारांविरुद्ध वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थकबाकीदारांची वीज कापण्याच्या मोहिमेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्थगिती दिली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या मोहिमेवरील स्थगिती उठवावी होती. त्यानुसार महावितरणने आज पूर्ण तकदीने थकबाकीदारांविरुद्ध वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील आज पहिल्या दिवशी शहरातील एकूण ५७४ थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. आता लॉकडाऊन लागल्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली. लॉकडाऊन असेपर्यंत ही मोहीम बंद राहील. परंतु ज्या भागात लॉकडाऊन लागू नाही, अशा नागपूर ग्रामीण सर्कलमध्ये यावर कुठलीही बंदी राहणार नाही.