नागपूर : भार व्यवस्थापनाच्या माध्यमातून भारनियमन (लोडशेडिंग) नियंत्रणात ठेवणे व परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा महावितरणने केला असला, तरी सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात नियंत्रण करणे कठीण होत आहे. परिणामी बहुतांश लोडशेडिंग याच काळात होत आहे. त्यामुळे भविष्यातही याच वेळेत वीज कपात होण्याची शक्यता दिसून येते.
कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, सकाळी व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत वीज संकट वाढण्याची परिस्थिती आहे. सौरऊर्जेद्वारा कंपनीला दिवसा जवळपास २ हजार मेगावॅट वीज मिळत आहे. परंतु, सकाळी व सायंकाळी याचे उत्पादन २०० ते ३०० मेगावॅटपर्यंतच होत आहे. दुसरीकडे सायंकाळनंतर विजेची मागणीसुद्धा प्रचंड वाढते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जी-१ व जी-२ श्रेणीमध्ये एक-एक तास आणि जी-३ श्रेणीमध्ये सव्वा तास वीज कपात झाली. दुसरीकडे कंपनीचा असा दावा आहे की, तापमान व विजेची मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे निर्माण झालेले वीज संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यानंतर कुठेही लोडशेडिंग झाले नाही. मागील दोन दिवसात कृषिपंपांना ८ तास वीज दिली जात आहे.
लोडशेडिंग नियंत्रणात आणण्यासाठी झालेले प्रयत्न
- पॉवर एक्सचेंजकड़ून २००० मेगावॅट वीज खरेदी केली
- केंद्र सरकारकडून कोळसा व गॅस पुरवठा वाढविण्याची मागणी
- महावितरणने केली महाजेनकोला अधिकाधिक वीज उत्पादन करण्याची विनंती
- राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये वॉर रूम
- लोडशेडिंग तात्पुरते असल्याचे म्हटले आहे
एनटीपीसीचे सोलापूर युनिट सुरू झाल्याने दिलासा, महाजेनकोकडून निराशा
एनटीपीसीच्या सोलापूर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट युनिटचे उत्पादन शनिवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे वीज संकटाशी सामना करत असलेल्या राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, महाजेनकोच्या वीज केंद्रांकडून मात्र निराशा होत आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज केंद्रांचे क्षमतेप्रमाणे उत्पादन होत नाही. महाजेनकोकडून मिळत असलेल्या विजेच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याचे महावितरणचे अधिकारीही स्पष्टपणे सांगत आहेत.