नागपूर : महापारेषणच्या १३२ केव्ही क्षमतेच्या बेसा सबस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. आता महापारेषण नवीन पॉवर ट्रान्सफाॅर्मर बसवित आहे. या कामात दोन ते तीन दिवस लागू शकतात. त्यामुळे पॉवर ट्रान्सफाॅर्मर सुरू होईपर्यंत या परिसरात वीज संकट राहील, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
‘भार व्यवस्थापन’साठी टप्प्या-टप्प्याने लोडशेडिंगची वेळ आली आहे. दुसरीकडे महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे यांचे म्हणणे आहे की, कंपनीकडे पर्यायी ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध हाेता. जुन्या ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती करण्याऐवजी आता उपलब्ध असलेला ट्रान्सफाॅर्मरच सबस्टेशनमध्ये बसवण्यात येत आहे.
रविवारी रात्री बेसा सबस्टेशनच्या २५ एमवीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये मोठा बिघाड झाला. त्यामुळे महावितरणचे महाल डिव्हिजन पूर्णपणे प्रभावित झाले. काँग्रेसनगर डिव्हिजनमधील काही भागातही वीज संकट निर्माण झाले. पर्यायी व्यवस्था करून या डिव्हिजनमधील वीज समस्या दूर करण्यात आली. मात्र महाल डिव्हिजनमधील दक्षिण नागपुरातील भागातील समस्या मात्र सुटू शकली नाही.
ट्रान्सफाॅर्मर बिघडल्यानंतर एकूण प्रभावित १३ पैकी ४ फीडरला दुसऱ्या सबस्टेशनशी जोडून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. उर्वरित ९ ट्रान्सफाॅर्मरला बेसा सबस्टेशनच्या दुसऱ्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरशी जोडण्यात आले परंतु या ट्रान्सफाॅर्मरचा लोड वाढल्याने अनेक भागात लोडशेडिंग करावे लागले. महावितरणचे म्हणणे आहे की, रात्री विजेची मागणी दुप्पट असल्याने वीज पुरवठा बाधित होऊ शकतो. कंपनीने दोन ते तीन दिवसांत ही समस्या दूर करण्याचा दावा करीत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे यांनी सबस्टेशनला भेट देऊन दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला.
उकाड्याने हाल बेहाल
ऐन उन्हाळ्यात वीज गेल्याने उकाड्यामुळे लोकांचे हाल बेहाल झाले आहेत. विशेषत: रात्री वीज जात असल्याने लोकांची झोपमोड होत आहे. बेसा परिसरात फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना तर पाणी संकटाचाही सामना करावा लागत आहे.
- प्रभावित वस्त्या
ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या बिघाडामुळे एकूण १३ फीडरवर लोडशेडिंग करावे लागत आहे. यामुळे प्रभावित झालेल्या वस्त्यांमध्ये दिघोरी, जानकीनगर, महालक्ष्मीनगर, ताजबाग, मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर, विहीरगाव, ग्रेसिया कॉलनी, न्यू सुभेदार, जुना सुभेदार, श्रीकृष्णनगर, आशीर्वादनगर, भोलेनगर, नरसाळा आदी वस्त्यांचा समावेश आहे.
रात्री विजेची मागणी अधिक
प्रभावित परिसरात दिवसेंदिवस जवळपास १८ मेगावॅट विजेची मागणी नोंदविली जात आहे. सायंकाळी ७ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मागणी ३२ मेगावॅटपर्यंत पोहोचत आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करणे कठीण होत आहे. त्यामुळे रात्री १ ते २ तास वीज जाण्याची शक्यता आहे.