लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळशामुळे राज्यभरात प्रचंड विजेचे संकट निर्माण झाले आहे. विजेचे उत्पादन प्रभावित झाले आहे. सोमवारचाच विचार केला तर तब्बल ८०० मेगावॅट वीज खरेदी करावी लागली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोडशेडिंगची शक्यता लक्षात घेता महावितरणने नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले आहे. परंतु, शहरातील सर्वाधिक महत्त्वाची इमारत असलेल्या विधानभवनात मात्र या विनंतीपर आवाहनाची सर्रास थट्टा केली जात आहे. रिकामे पडलेल्या मंत्रिमंडळाच्या सभागृहापासून तर सचिवांचे कार्यालय दिव्यांनी उजळून निघत आहेत. कार्यालयात कुणी नसतानाही पंखे व एसी तसेच सुरू ठेवले जात असल्याचा प्रकार सोमवारी दिसून आला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधानमंडळ प्रधान सचिवांच्या उपस्थितीत सोमवारी विधानभवनात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वच वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीनंतर अधिकारी भोजनासाठी रवाना झाले. या दरम्यान, लोकमत चमूला विधानभवनातील जे दृष्य दिसून आले तर खरंच आश्चर्यजनक होते. मंत्रिमंडळाचे सभागृह रिकामे पडले होते. खुर्च्या रिकाम्या होत्या. तरीही दिवे, पंखे, एसी सुरू होते. अवर सचिव, उपसचिवांच्या कार्यालयांमध्येसुद्धा असेच चित्र होते. प्रधान सचिवांचे रिकामे असलेले कार्यालयसुद्धा दिव्यांनी उजळले होते. इतकेच नव्हे, तर कॉरिडोरमधील दिवे व पंखेसुद्धा सुरू होते.
वीज बचतीचे आवाहन केवळ नागरिकांसाठीच का?
विधिमंडळातील परिस्थिती पाहून वीज बचतीचे आवाहन केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. विधानभवनापासून तर इतर शासकीय कार्यालयांसाठी हे आवाहन महत्त्वाचे नाही का? यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने घाईगर्दीत वीज बंद करणे राहून गेले, सफाईनंतर वीज बंद करण्यात आली होती, असे सांगितले.