नागपूर : जिल्हा परिषदेत ७ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाचा २०२० च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. पराभवाचा वचपा सोबतच सत्तेत येण्याची पुन्हा एक संधी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला भेटली आहे. १६ पैकी १० ते १२ जागा भाजपाच्या पदरी पडल्यास सत्तेचे समीकरण बदलण्याचे संकेत आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वय झाला असला तरी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत काँग्रेस व राष्ट्रवादीलाच आव्हान दिले आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्याने सत्तेत सेनेला सोबत घेतले पण सेनेचा एकच सदस्य असल्याने सेना सत्तेबाहेरच राहिली. राष्ट्रवादीलाही मोठ्या प्रयत्नाअंती एक पद पदरात पाडून घेण्यात यश आले. पण ते पद राष्ट्रवादीच्या कोट्यातून नसल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने संपूर्ण सत्तेची सूत्रे स्वत:कडे ठेवली. त्यामुळे राष्ट्रवादीची उपेक्षाच झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने १२ उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. अशात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये वाढलेली अंतर्गत धुसफूस, काँग्रेसच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांवर नाराजी या सर्व बाबी पोटनिवडणुकीत काँग्रेससाठी आव्हानात्मक आहेत. दुसरीकडे भाजपाने १६ ही जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. गुमथळा सोडल्यास बंडखोरीची फारशी लागण भाजपात नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालाचा काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२ वर्षांचा कार्यकाळ निराशाजनक
काँग्रेस, राकाँ, शेकाप व शिवसेना आघाडीचा २ वर्षांचा कार्यकाळ निराशाजनक ठरला आहे. आघाडीने सत्तासूत्रे सांभाळताच काही दिवसातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. कोरोना महामारीमुळे विविध निर्बंध आणि वारंवार लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे आघाडीला जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव असे काहीच करता आले नाही. त्यातच विकामकामे होत नसल्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. यादरम्यान जिल्हा परिषदेत गाजलेले घोटाळे, निधीअभावी रखडलेला विकास, वैयक्तिक लाभांच्या योजना थंडबस्त्यात आदी मूलभूत समस्या सोडविण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याने मतदारांमध्येही नाराजी आहे. याचाही फटका सत्ताधारी आघाडीला बसू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
- सध्याची स्थिती
पक्ष सदस्य संख्या रद्द जागा उर्वरित
काँग्रेस ३१ ७ २४
भाजप १५ ४ ११
राष्ट्रवादी १० ४ ६
शेकाप १ १ ०
शिवसेना १ ० १