मन:शक्ती प्रशिक्षक भूषण दवे : मनाची ताकद पाहून मुलांना वाटला विस्मय नागपूर : मनाची शक्ती अगाध आहे. आपण जो विचार करू त्या वेगाने आपले मन कार्य करीत असते पण आपले आपल्याच मनाकडे दुर्लक्ष होते. स्मरणशक्ती हा मनाचाच खेळ आहे. प्रत्येकाजवळच सारखी स्मरणशक्ती असते पण आपण त्याचा उपयोगच करत नाही. त्याचा उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन करीत इतरांच्या मनात काय चालले आहे, हे चपखलपणे ओळखून आज ‘माईण्ड पॉवर ट्रेनर’ भूषण दवे यांनी मुलांना अक्षरश: थक्क करून सोडले. सेतू या मुलांचे भावविश्व हळुवार उकलत त्यांच्या छंदांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि पालकांचे समुपदेशन करणाऱ्या संस्थेच्यावतीने दोनदिवसीय कार्यशाळा आणि छंदोत्सव प्रदर्शनाचे आयोजन पूर्णचंद्र बुटी सभागृह आणि प्रांगणात करण्यात आले होते. या छंदोत्सवाचा आज समारोप करण्यात आला. याप्रसंगी पहिल्या सत्रात भूषण दवे यांच्या ‘मेमरी टेक्निक्स’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत स्मरणशक्तीची काही प्रात्यक्षिके दाखविताना त्यांनी मुलांना आश्चर्यचकित केले. मुलांना तर त्यांच्यात काहीतरी ‘सुपर नॅचरल पॉवर’ असल्याचीच शंका आली. पण असे काहीही नसून केवळ मनाच्या शक्तीचा योग्य उपयोग केला तर आपण कुठलेही मोठे काम यशस्वी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी काही प्रात्यक्षिकेही करून दाखविलीत आणि स्लाईड्सच्या माध्यमातून हा विषय समजावून सांगितला. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य उपयोग केला आणि त्याचे समन्वयन केले तर आपली स्मरणशक्ती वाढविता येते. स्मरणशक्ती वाढली तर लिकिंग, असोसिएशन आणि गणिताचे, विज्ञानाचे मोठाले फॉर्म्युलेही सहज लक्षात ठेवता येतात. आपण हा अभ्यास सातत्याने करत राहिलो तर यश नक्कीच मिळते. स्मरणशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करताना आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला तर इतरांपेक्षा मोठे आणि भन्नाट कामही करता येते, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी एका मुलीला तिची जन्मतारीख तिच्याच मनात एकदा आठवायला लावली आणि तिने काहीही सांगितले नसताना त्यांनी ती अचूक ओळखली. एका अनोळखी मुलीला बोलावून तिचे नाव त्यांनी अचूक सांगितले.यामुळे मुलांना खूपच आश्चर्य वाटले. ही जादू नसून अभ्यासाचा भाग आहे, असे दवे यांनी सांगितल्यावर मुलांनी त्यांच्याभोवती घोळका केला आणि स्मरणशक्ती कशी वाढवावी, ते समजून घेतले. संचालन स्नेहा दामले यांनी केले. (प्रतिनिधी)
मन:शक्तीने इतरांचे विचारही ओळखता येऊ शकतात
By admin | Published: January 05, 2015 12:53 AM