लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या गावाचा वीजपुरवठा सलग सहा दिवस खंडित हाेता. संतप्त नागरिकांनी सरपंचाच्या घरावर माेर्चा घेत घेराव केला. सरपंचाने दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच वीजपुरवठा सुरळीत हाेणार असल्याची ग्वाही देत नागरिकांना शांत केले.
चिचाळा गावाला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने दाेन ट्रान्सफार्मर बसविले आहेत. यातील एका ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले हाेते. वारंवार विनंती करूनही महावितरण कंपनीचे कर्मचारी ट्रान्सफार्मर दुरुस्त करीत नसल्याने नागरिकांनी मंगळवारी रात्री सरपंच मनिषा पडाेळे यांच्या घरावर माेर्चा नेला.
सरपंच पडाेळे यांनी याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करून ही समस्या मार्गी लावावी, अशी नागरिकांनी आग्रही भूमिका घेतली हाेती. त्यावर सरपंच मनिषा पडाेळे यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम सुरू असून, थाेड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत हाेणार असल्याची ग्वाही देत नागरिकांना शांत केले. दुसरीकडे, ही समस्या कायमची साेडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
...
सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका
खरीप हंगाम सुरू झाल्याने गावातील शेतकऱ्यांसह मजूर वर्ग दिवसभर शेतात राबतात. रात्री त्यांचा आराम करण्याचा वेळ असताना वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यातच डासांमुळे लहानग्यांपासून माेठ्यांपर्यंत सर्वच हैराण हाेतात. शिवाय, साप, विंचू व इतर धाेकादायक सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर असताे. अंधारामुळे ते फारसे दिसून येत नसल्याने गुरांना धाेका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने ही समस्या तातडीने साेडवावी, याबाबत आपण आग्रही असल्याची माहिती नागरिकांनी दिली.