लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा याेजनांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. धानला हे तालुक्यात महत्त्वाच्या लाेकप्रतिनिधीचे गाव असून, या गावातील पाणीपुरवठ्यासह पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
माैदा तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ही सर्व गावे ६३ ग्रामपंचायत व गटग्रामपंचायत अंतर्गत विभागण्यात आली आली आहेत. या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यात ६३ पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. काही ठिकाणी एका पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जाताे. यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, काही गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांना रात्रभर अंधारात राहावे लागत आहेत. अंधारामुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका बळावला आहे, अशी माहिती धानलासह इतर गावांमधील नागरिकांनी दिली.
........
आमदार, जि.प. सभापतीच्या गावाचा समावेश
धानला (ता. माैदा) हे आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. येथील पाणीपुरवठा याेजना आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २३) खंडित करण्यात आला. धानला ग्रामपंचायतकडे ६ लाख ४५ हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात सहा लाख रुपये पाणीपुरवठा याेजनेचे तर ४५ हजार रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
तहसील कार्यालयासह माैदा शहर अंधारात
माैदा तहसील कार्यालयाकडे दाेन लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने या कार्यालयाचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी खंडित करण्यात आला हाेता. प्रशासनाने सायंकाळी यातील ५० हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे कार्यालयीन कामे दिवसभर ठप्प झाली हाेती. माैदा नगरपंचायतकडे १९ लाख रुपये पाणीपुरवठ्याचे व पथदिव्यांचे ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या दाेहाेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने माैदावासीयांना एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.
...
जिल्हा परिषदेने जबाबदारी झटकली
पूर्वी सर्व गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांची बिले जिल्हा परिषद प्रशासन भरायचे. भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात सन २०१६ पासून जिल्हा परिषदेने ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांचा आकडा फुगत गेला. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने ही बिले ग्रामपंचायत प्रशासनाने भरावी असा निर्णय घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने उत्पन्न लक्षात घेता, त्यांना ही बिले पुढील किमान १० वर्षे तरी भरणे शक्य नाही. युती शासनाच्या काळातील या चुकांचे परिणाम आता ग्रामीण भागातील जनतेला साेसावे लागत आहे.
...
स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वेळावेळी नाेटीस देण्यात आल्या. काही प्रमाणात का हाेईना, थकीत बिलाचा भरणा करावा, अशी सूचनाही त्यांना दिली. त्यांनी ही सूचना गांभीर्याने न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.
- रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,
महावितरण कंपनी, माैदा.