नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार ऊर्जा पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:40 PM2020-03-06T21:40:36+5:302020-03-06T21:41:56+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत कोराडी येथे ऊर्जा पार्क स्थापित करण्याची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ऊर्जा पार्क तयार करण्याची घोषणा करीत नागपूरला अनोखी भेट दिली आहे. महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात साकार होणारा हा पार्क आगळावेगळा असेल. येथे लोकांना वीज तयार कशी होते याची माहिती मिळेल. इतकेच नव्हे तर ट्रान्समिशन लाईनद्वारे ती लोकांच्या घरापर्यंत कशी पोहोचते याची इत्थंभूत माहिती उपलब्ध होईल.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत कोराडी येथे ऊर्जा पार्क स्थापित करण्याची घोषणा केली. ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना आहे. याबाबत पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, हे पार्क आकर्षणाचे केंद्र ठरेल. कोराडी येथील देवीच्या मंदिरात लाखो भक्त दर्शनाला येतात. लागूनच असलेल्या वीज केंद्राला पाहून त्यांच्या मनात वीज कशी तयार होत असेल याचे कुतूहल निर्माण होते. नागरिकांचे हे कुतूहल दूर करण्याचे काम हे पार्क करेल. नागरिकांना येथे वीज बचतीचा संदेशही दिला जाईल. राऊत म्हणाले, वीज केंद्र संवेदनशील ठिकाण असते. सुरक्षा कारणांमुळे येथे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. परंतु ऊर्जा पार्क साकार झाल्यानंतर नागरिक येथे विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतील. महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या जागेवर हे पार्क साकार होईल. याला साकार करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात प्रधान सचिव (ऊर्जा), असीम गुप्ता, महाजेनकोचे प्रबंध निदेशक शैला ए, खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, मुख्य अभियंता अनंत देवतारे व आर्किटेक्ट अशोक मोठा प्रयत्नरत आहेत.
वीज केंद्रांचे मॉडेल ठरणार आकर्षणाचे केंद्र
ऊर्जा पार्कमध्ये कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मॉडेल तयार केले जाईल. यासोबतच वीज प्रकल्प, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व गॅस आधारीत वीज उत्पादन प्रकल्पांचे मॉडेल तयार केले जातील. येथे विविध स्त्रोतांच्या माध्यमातून वीज कशी तयार केली जाते, ती लोकांपर्यंत कशी पोहोचते, याची माहिती सोप्या शब्दात दिली जाईल.
आणखी काय मिळाले
- नागनदीमध्ये ६० टक्के दूषित पाणी सोडले जाते. यामुळे नदीच्या आजूबाजूला दुर्गंधी राहते. अर्थसंकल्पात नदी स्वच्छ करण्याच्या कामाला पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
- उत्तर नागपुरात प्रस्तावित शासकीय इंजिनियरिंग कॉलेजनंतर मिहानमध्ये स्थापित करण्यात आले. अर्थसंकल्पात या कॉलेजला उत्कृष्ट केंद्र बनवण्याची घोषणा करण्यात आली.
- इंदोरा येथे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या संकल्पनेने साकर होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या केंद्रात सभागृह, वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ ठेवण्यासाठी हॉल, बँक काऊंटर, अतिथीगृह बनवण्यात येणार आहे.