आशिष गाेडबाेले
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला बाजारात मिळत नसलेला याेग्य भाव यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. काेराेना संक्रमणामुळे त्यांच्या संकटात आणखी भर पडली. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी थकीत बिलापाेटी त्यांच्याकडील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नाेटीस महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. यात थकीत रकमेचा भरणा नाेटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरण्याची सूचनाही महावितरण कंपनीने केली आहे.
यावर्षी साेयाबीनचे पीक किडींमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, किडींमुळे कापसाच्या उत्पादनातही माेठी घट आली आहे. भाजीपाल्याच्या पिकांना समाधानकारक भाव मिळत नसून, तुरीचा पेराही कमी हाेता. त्यातच शेतकऱ्यांची गहू व हरभऱ्याच्या पिकावर भिस्त हाेती. अशा विपरीत परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीच्या खापरखेडा (ता. सावनेर) कार्यालयाने इसापूर (ता. सावनेर) येथील ३५० शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत बिलाचा १५ दिवसांत भरणा करण्याच्या नाेटीस बजावल्या आहेत. या रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्याकडील कृषिपंपांचा वीजपुुरवठा खंडित करण्याची सूचनाही या नाेटीसद्वारे दिली आहे.
दिवसेंदिवस पिकांचा उत्पादन खर्च वाढत चालला असून, उत्पादनात घट येत आहे. त्यातच बाजारात शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. त्यातच काेराेनाच्या संकटाची भर पडली. पिकांचे नुकसान व उत्पादनात घट आल्याने इसापूर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्याकडील पीककर्ज व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा भरणा करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे त्यांनीही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. सध्या जीवन जगणे अवघड झाल्याने बिलाचा भरणा करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
...
रीडिंग न घेता बिले
कृषिपंपाच्या विजेची बिले ही रीडिंग न घेता पाठविली जाते. हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी सरासरी बिले दिली जात असून, न वापरलेल्या विजेच्या बिलाचाही भरणा करावा लागताे. शासनाने कृषिपंपाच्या विजेचे दर वाढविले असून, बहुतांश बिले सदाेष असतात. ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली; परंतु यावर कुणीही ताेडगा काढला नाही. ही सरसकट व सरासरी रकमेची बिले अन्यायकारक लूटमार करणारी असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
...
चुकांची दुरुस्ती करा
इसापूर येथील बहुतांश शेतकऱ्यांना चुकीची बिले देण्यात आली आहेत. बिलाच्या एकूण रकमेतील ५० टक्के रकमेचा एकमुस्त भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले हाेते. या ५० टक्के रकमेचा भरणा करूनही उर्वरित रक्कम दुसऱ्या बिलात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या चुकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यात आधी दुरुस्ती करावी, अशी मागणीही इसापूर येथील सम्राट गजभिये, कैलास गोडबोले, बंडू मेश्राम, नरेंद्र ढेपे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.