नागपूर : राज्यात सध्या वीजटंचाईचं संकट आहे. लोडशेडिंगमुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तर, दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांच्या सभांमध्ये राजरोसपणे वीजचोरी होत असल्याचा प्रकार समोर आलाय. गुरुवारी नागपुरात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भरलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचं समोर आलं आहे.
काल नागपुरातील गजानन नगर परिसरात संजय राऊत यांची सभा पार पडली. या सभेसाठी मंचाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खांबावरच्या विजेच्या तारेवर आकडे टाकून वीज चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे, आम्ही कोणतीही वीजचोरी केली नाही, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सभास्थळामागे गजानन महाराजांचे मंदिर होते. त्या मंदिरातील संचालकांच्या परवानगीने आम्ही वीज पुरवठा घेतला. डेकोरेशनचे काम दिलेल्या व्यक्तीने एखादा हॅलोजन चुकीच्या पद्धतीने कुठून घेतला का? याची आम्ही विचारणा केली आहे, असे आयोजकांनी सांगितले.
या सभेत राऊत यांनी नागपूर मनपातील भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले. नागपूर मनपात घोटाळा करणारे तुरुंगात जातील. नागपूरकरांची अनेक वर्षे फसवणूक झाली असून त्याविरुद्ध आपण लढाई केली पाहिजे असे राऊत म्हणाले होते. पण, त्यांच्याच सभेत वीज चोरी झाल्याची बाब समोर आली आहे.
या प्रकरणावर राऊतांना प्रश्न विचारले असता, वीज चोरी झाल्याचं मलाही कळलं, या मुद्द्यावर पक्षांतर्गत समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.