वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरण नागपूर : लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायदा (पोक्सो) चे विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीवरील विनयभंग प्रकरणी एका आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लोकेश लक्ष्मण डाहारे (२३) रा. धामनी, असे आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित शाळकरी मुलगी ४ जानेवारी २०१४ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आपल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यास गेली असता आरोपी लोकेशने पीडित मुलीच्या मैत्रिणीला बाहेर पाठवून दिले होते. त्यानंतर त्याने पीडित मुलीला चिवडा खाण्यास देऊन तिचा विनयभंग केला होता. वेलतूर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भादंविच्या ३५४ (अ)(१) , पोक्सोच्या कलम ८ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१)(११) अन्वये गुन्हा दाखल करून ११ जानेवारी २०१४ रोजी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरभाते यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३५४-अ कलमांतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, पोक्सोच्या कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयाने आरोपीची अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१)(११) अंतर्गतच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार अरुण भुरे, दिलीप कडू आणि सखाराम वाढई यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
पोक्सोत आरोपीला तीन वर्षे कारावास
By admin | Published: March 09, 2017 2:29 AM