लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीएनआयटीने पीपीई किट, मास्क, अॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझेशन युनिट विकसित केले आहे. या युनिटमध्ये आरोग्य सेवकांच्या सुरक्षा साधनांचे अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनद्वारे निर्जंतुकीकरण होते. मंगळवारी एम्सला कोरोनाविरुद्ध लढण्याकरिता दोन युनिट हस्तांतरित करण्यात आले.प्रा. किशोर भुरचंदानी, डॉ. प्रभात शर्मा, डॉ. दीप गुप्ता, सुधीरकुमार सिंग, श्रवणकुमार, रविशकुमार वर्मा व मनोज हाते यांनी या युनिटची निर्मिती करताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर्स व अन्य आरोग्य सेवकांच्या पीपीई किट, मास्क, अॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणाकरिता यंत्राची गरज होती. ती बाब लक्षात घेता हे युनिट तयार करण्यात आले. व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी. एम. पडोळे यांनी गेल्या २५ एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक आणि अभियंते अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझर मॉडेलची निर्मिती करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हे मॉडेल युद्धस्तरावर काम करून ४ मे रोजी पूर्ण करण्यात आले. मॉडेलचे डिझाईन तयार करणे, त्याची तपासणी करणे इत्यादी कामे केवळ आठ दिवसात पूर्ण करण्यात आली. हे युनिट आपोआप चालणारे आहे. त्यामुळे युनिट हाताळण्याकरिता विशेष कौशल्याची गरज नाही. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांमध्ये असलेली तांत्रिक अचूकता या युनिटमध्ये आहे.व्हीएनआयटी येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. पी. एम. पडोळे यांनी हे युनिट एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता यांना प्रदान केले. दरम्यान, या दोघांनी यासंदर्भातील एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही युनिट सर्वांसमक्ष कार्यान्वित करून दाखविण्यात आले. याप्रसंगी प्रा. व्ही. बी. बोरघाटे, प्रा. जस्टीन भट, डॉ. मृणाल पाठक, डॉ. संजीव चौधरी, डॉ. प्रथमेश कांबळे आदी उपस्थित होते.