सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’ आणि पीपीई किट हे समीकरण आता घट्ट झाले आहे. परंतु या महागड्या किटचा एकदा वापर झाला की फेकून द्यावे लागते. जैविक कचरा म्हणून त्याचा व्यवस्थापनाचासुद्धा खर्च असतो. शिवाय, किट घालून पाच-सहा तास रुग्णसेवा द्यावी लागत असल्याने उष्णतेने डॉक्टर आणि प्रयोगशाळा तज्ज्ञांना असह्य होते. सेवाग्रामच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने यावर उपाय शोधून काढला.या विभागाचे डॉ. राहुल नारंग यांनी अशा पीपीई किट तयार केल्या, ज्या २० वेळा धुऊन पुन्हा वापरता येते. शिवाय, याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत तिपटीने कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही किट घातल्याने गरमीचा त्रासही होत नाही. ‘कोरोना’ विरुद्धच्या ‘दीर्घ’ लढाईसाठी या किटची मोठी मदत होणार आहे.पीपीई किट म्हणजे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण. एखाद्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षणसाठी पीपीई किट वापरले जाते. डॉक्टर, परिचारिका स्वत:च्या सुरक्षेसाठी या किटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रोज सुमारे २०० वर किटचा वापर होता. एका किटची किंमत रुपये ८०० ते १२०० च्या दरम्यान आहे. या किटचा एकदाच वापर होत असल्याने यावर मोठा खर्च होत आहे.म्हणूनच सेवाग्रामच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने यावर काहीतरी उपाय शोधून काढायचा असे ठरवले. या विभागाचे प्राध्यापक डॉ. नारंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले, किटच्या कापडाच्या संदर्भात थेट ‘डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन’शी(डीआरडीओ)संपर्क साधला. वारंवार धुऊन आणि निर्जंतुकीकरण करून वापरता येईल, असे कापड उपलब्ध असल्याची माहिती करून घेतली.गुजरातवरून हे खास कापड बोलवून घेतले. या कापडावर विविध चाचण्या करून घेतल्या. कॉलेजच्या लिनेन विभागाकडून विशेष गाऊनच्या स्वरूपात शिवून घेतली. ही विशेष किट धुऊन वापरता येते, शिवाय गाऊनच्या स्वरूपात असल्याने त्यात हवा खेळती राहते.
उष्णता कमी करण्यासाठी खादीची बंडीडॉ. नारंग म्हणाले, पीपीई घातल्यानंतर उष्णतेचा फार त्रास होतो. यासाठी खादीची साधी बंडी वापरण्याची कल्पना समोर आली. या बंडीवर ही किट घातल्यास घाम शोषला जाऊन उष्णतेचा त्रास कमी होतो. ही उष्णता आणखी कमी करण्यासाठी बंडीला चार मोठे खिसे शिवून घेतले आणि त्या खिशात प्रयोगशाळेत वापरतात ते ‘फेस चेंज मटेरियल'(पी.सी.एम.)फ्रीजमध्ये गार करून ठेवणे सुरू केले. ‘पीसीएम’ कित्येक तास थंड राहू शकते. ही किट तयार करायला २५० रुपये खर्च आला.
कोविड हॉस्पिटलमध्ये वापरणे शक्यप्रायोगिकस्तरावर हे पीपीई किट गाऊनच्या स्वरूपात तयार केली आहे. हे जर मूळ पीपीई किटनुसार शिवून घेतली तर कोविड हॉस्पिटलमध्येही वापरता येऊ शकते. यासाठी गुजरातमधून पुन्हा कापड मागविले आहे. या संशोधनात प्रियंका शहाणे व डॉ. अंजली पातोंड यांचेही सहकार्य लाभले आहे.-डॉ. राहुल नारंग,प्रा. मायक्रोबायोलॉजी विभाग, महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, सेवाग्राम