योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय सेवा करण्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात नागरिकांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.मनोजकुमार हरीराम हनवते (आंबाटोली, समतानगर झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. तो मागील सहा वर्षांपासून दवाखाना चालवत होता.
काही नागरिकांनी त्याच्याविरोधात २०२३ सालीच तक्रारी केल्या होत्या. मंगळवारी झोनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान यांनी एप्रिल महिन्यात त्याच्या दवाखान्याची पाहणी केली. त्याने वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचे प्रमाणपत्र, छत्तीसगड येथील आयुष व आरोग्य विद्यापीठातून बीएएमएस पदवी २०१८ साली पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डॉ. खान यांना दाखविले होते. त्याच्याकडे सेंट्रल कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन येथे २०२१ साली नोंदणी केल्याचेदेखील प्रमाणपत्र होते. डॉ. खान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत हनवते याच्या प्रमाणपत्रांची मुंबईच्या महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कार्यालयातून पडताळणी केली. त्यावेळी त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब समोर आली. तो त्याच्या आधारावर वैद्यकीय व्यवसाय करत होता. डॉ. खान यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात फसवणुकीसोबतच वैद्यकीय व्यवसायी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.