शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज : विश्व स्वधर्म संमेलनाचा समारोप नागपूर : आपल्या धर्मातच जीवनाचा मार्ग आहे. या तत्त्वावर विश्वास ठेवून स्वधर्मातच जीवनाचे कल्याण शोधले पाहिजे. आपल्या धर्मात व्यक्तीच्या उत्थानाचे जे मार्ग सांगितले आहेत, त्याचेच अनुसरण प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. प्रत्येक धर्मात जन्माला येणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या धर्मावर विश्वास ठेवावा आणि स्वधर्म पालनातून आपली उन्नती करावी, असे मत शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज यांनी व्यक्त केले. श्री शिवशक्ती सेवा समिती, उमरेडच्यावतीने रेशीमबाग प्रांगणात आयोजित तीन दिवसीय विश्व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. आज या संमेलनाचा समारोप करण्यात आला. शंकराचार्य म्हणाले, धर्माच्या बाबतीत कुणीही संशय ठेवू नये. आपल्या धर्माच्या मूलतत्त्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्यातूनच माणसाची उन्नती होते. आपल्या धर्माने सांगितलेल्या तत्त्वावरच आपले जीवन असले पाहिजे. याप्रसंगी सकाळच्या सत्रात ज्योतिषाचार्य डॉ. विजयकुमार दाणी, इस्कॉनचे अनंतशेष प्रभू, जयश्री पेंढारकर यांचे प्रवचन झाले. सायंकाळच्या सत्रात दीपाली घोंगे यांनी श्रीकृष्णनाट्याचे सादरीकरण केले. दिल्लीच्या राजेंद्र गंगानी यांच्या सुरेल कत्थक नृत्याला याप्रसंगी उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाला उद्योगपती बसंतलाल शाह, संघाराम महाविहार प्रशिक्षण संस्थानचे भंते श्रद्धाशील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, शंकरानंद सरस्वती स्वामी, हार्दिक स्वामी, सद्गुरुदास महाराज, सुरभी हांडे, राजे रघुजी भोसले आणि राजे मुधोजी भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे अध्यक्ष दत्ता महाराज जोशी यांनी केली.(प्रतिनिधी)
स्वधर्माचे पालनच सर्वश्रेष्ठ आहे
By admin | Published: December 31, 2015 3:10 AM