लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पेंच नदीच्या काठी वसलेल्या काही गावांना नेहमीच पूर व नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागताे. या गावांमधील नागरिकांना स्वत:चा व इतरांचा बचाव करण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती व्हावी म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल)च्या जवानांनी पेंच जलाशयात सराव केला. यात पारशिवनी तालुक्यातील कर्मचारी व स्वयंसेवक सहभागी झाले हाेते.
३० ऑगस्ट २०२० राेजी पेंच धरणाचे १६ गेट प्रत्येकी ६ मीटरने उघडण्यात आल्याने पारशिवनी, कामठी, माैदा व रामटेक तालुक्यातील पेंच व कन्हान नदीकाठच्या गावांना पुराचा धाेका उद्भवला हाेता. पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली हाेती. अशी परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास नागरिकांनी काेणती काळजी घ्यावी याबाबत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
ओबीएम बोट, ओबीएम मशीनची कार्यप्रणाली, मशीन बोटवर बसवण्याची पद्धती, बोटीत हवा भरण्याची पद्धती, आकस्मित वेळेत बोट बंद करण्याची पद्धती, लाइफ जॅकेटचा वापर, बोट चालविताना व मागे पुढे घेताना घ्यावयाची काळजी, पुरात अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर कसे काढावयाचे, बोटीची वाहून नेण्याची क्षमता व गती, टार्गेट निश्चिती यासह इतर महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. बाेट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात तहसीलदार प्रशांत सांगडे, नायब तहसीलदार राजाराम आडे, एसडीआरएफचे मनीष खंडाते, गोलू वरघड, मंडळ अधिकारी राजेश घुडे, जगदीश मेश्राम, बबन जगदने, तलाठी मिलिंद दुधे, रितेश सवाईतुल, विश्वजित पुरमकर, संदीप पालीवाल, गणेश चव्हाण, देवाशील देशमुख, अरविंद डोनारकर, ऋषी गोरले, भूषण इंगोले, विजय भुते, रुपेश खंडारे, राजेश मघरे, भीमराव वागधरे, विजय ठाकरे, राजेश उके, अतुल मेश्राम, मंगेश उके, विशाल सहारे सहभागी झाले हाेते.
...
पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी
तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा द्यावा, हवामान खात्याने परिसरात जास्त पाऊस काेसळण्याचा अंदाज व्यक्त केल्यास याची माहिती लगेच नागरिकांना द्यावी, गावात पाणी शिरताच पोलीस पाटील व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तालुका प्रशासनाला कळवावे, महसूल प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करावे, नागरिकांनी लगेच गावातील उंच ठिकाणे, समाजभवन, शाळा, ग्रामपंचायतींमध्ये आश्रय घ्यावा, दुमजली इमारतींवर जावे, घरातील रिकामे प्लास्टिकचे व धातूचे गुंड, ड्रम यांना जाड प्लास्टिकने वरून बांधावे, ते पाण्यावर तरंगत असल्यामुळे घरी किंवा शेतात ठेवावे, हवाबंद शीतपेयांच्या रिकाम्या १० बाटल्यांचा एक संच बनवून ठेवावा, रबरी ट्यूब वापरावे, नाले एकट्याने पार करू नये, पूल अथवा खोलगट भागातून पुराचे पाणी वाहत असताना काेणत्याही वाहनाने पूर ओलांडू नये, तालुका पातळीवर स्वयंसेवकांची टीम तयार ठेवावी, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावी, अन्नदान व वस्त्रदान करणाऱ्यांची यादी तयार ठेवावी आदी काळजी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे यांनी केले आहे.
160921\4338img_20210916_140014.jpg
प्रात्यक्षिक