लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संवैधानिक पदावर जाताना प्रत्येकालाच शपथ घ्यावी लागते. निधर्मी राज्य आणि सर्वधर्मसमभाव जोपासून देशाच्या अखंडत्वासाठी वचनबद्धतेची ती शपथ असते. त्याचे पालन करूनच पदावर काम करावे लागते. महात्मा गांधी रामाचे भक्त होते. रामाचे भजन गायचे. अंतिम समयीही त्यांच्या तोंडी ‘हे राम’ हेच शब्द होते. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ८६ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विधानसभाध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर मंत्रिगण छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व विलास मुत्तेमवार, आ. विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, माजी आमदार देवीसिंह शेखावत आदी होते.भारताची आंतरिक ताकद मोठी असल्याचे सांगून प्रतिभाताई म्हणाल्या, संविधान ही भारताची गीता व जनसेवा हे मर्म आहे. विदर्भाचा जलद आणि सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्या म्हणाल्या, लेकीबाळी आणि भगिनींचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. बाळासाहेबांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत हे थोरपण बिनशर्त पाठिंब्यातून दर्शविले होते. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली. ते जुन्यांचे फलश्रुत व नव्या परंपरेचे बीजरूप आहेत. शरद पवार हे देशाच्या पटलावरील मुत्सद्दी नेते व २०१९ या वर्षाचे कर्मवीर आहेत, असा शब्दात त्यांनी दोघांचाही गौरव केला. आपल्या ५० वर्षांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा प्रवासही त्यांनी सांगितला.प्रतिभाताई मृदू दिसणाऱ्या कणखर नेत्या : शरद पवारप्रतिभाताई या मृदू दिसणाऱ्या पण कणखर नेत्या आहेत, असा गौरव शरद पवारांनी केला. ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना विधानसभेत त्यांचा कणखरपणा बरेचदा अनुभवला. सुखोई या वेगवान विमानात बसून प्रवास करणाºया या राष्ट्रपतिपदावरील महिलेचा कणखरपणाही जगाने अनुभवला. प्रतिभाताईंना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनविल्यावर बाळासाहेबांनी एनडीएचा विचार न करता क्षणात पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या सन्मानाचा हा भावबंधही त्यांनी सांगितला.वयैक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून ताईंचा सन्मान करण्याची संधी मिळणे हे भाग्य समजतो. शरद पवारांसोबत बाळासाहेबांची मतभिन्नता असली तरी मनभिन्नता कधीच नव्हती. या दोघांनाही संपन्न परंपरेचा अनुभव होता. त्यांचा सहवास व मार्गदर्शन आपणास मिळाले. प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.प्रारंभी स्वागताध्यक्ष नात्याने आ. अनिल देशमुख यांनी भाषणातून सर्वांचे स्वागत केले. आयोजन समितीचे कार्याध्यक्ष खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आयोजन समितीचे संयोजक डॉ. गिरीश गांधी यांनी मानले. समारंभाला खासदार, आमदार, माजी मंत्री व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार : प्रतिभाताई पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:30 PM
वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ८६ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना केले.
ठळक मुद्देनागरी सत्काराप्रसंगी व्यक्त केली अपेक्षा