नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काटोल मतदारसंघात भाजप उमेदवाराचा उघड प्रचार करणे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी प्रदेश काँग्रेसने देशमुख यांना शनिवारी नोटीस बजावत सात दिवसांत स्पष्टीकरण मागिवले आहे. मुदतीत स्पष्टीकरण न दिल्यास पक्षातून बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Pradesh Congress notice to Ashish Deshmukh)
जि. प. पोटनिवडणुकीत सावरगाव सर्कलमध्ये देशमुख हे भाजप उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. काँग्रेसचे विभागीय बूथ समन्वयक प्रकाश वसु यांनी या प्रकरणी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्ष व विदर्भ प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांची चौकशी समिती नेमली. मात्र, त्यांची देशमुख यांच्याशी भेट होऊ शकली नाही. निवडणुकीत सावरगावची जागा भाजपने जिंकली.
राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. आता निकालानंतर प्रदेश काँग्रेसने देशमुख यांची कृती अधिक गांभीर्याने घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश सचिव देवानंद पवार यांनी देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. आपण सतत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हंडोरे यांनी समज दिल्यानंतरही भूमिकेमध्ये सुधारणा झाली नाही, अशी नाराजी या नोटीसमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.