फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. दुसरीकडे शहरापासून फक्त १५ किलोमीटर परिसरातील पाच गावे अशी आहेत की, येथे वाहनाने जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या गावांना जोडणारे रस्ते नादुरुस्त आहेत. वर्ष २०१५ मध्ये या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. गिट्टी उखडली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.नागपूरपासून १५ किलोमीटर परिसरात ही पाच गावे आहेत. सर्व गावांचे एकमेकापासूनचे अंतर जेमतेम दोन किलोमीटर आहे. ग्राम सडक योजनेंतर्गत वर्ष २०१४ मध्ये वर्धा रोड ते झरी, बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या ९.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. यावर ६ कोटींचा खर्च करण्यात आला.परंतु आता या मार्गावरील गिट्टी उखडली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालविणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे लक्ष विचलित झाले की, खड्ड्यात पडून अपघात होण्याचा गंभीर धोका आहे.
उखडलेल्या पुलामुळे धोका वाढला९.५० किलोमीटर परिसरात झरीनजिक जगानन बाबा मंदिर व दर्गा आहे. मात्र येथून जवळचे असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या पुलाची अवस्था बिकट आहे. पुलावरून वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. पुलावरील सिमेंटचा थर पूर्णपणे निघाला आहे. पुलाच्या सळाकी बाहेर निघाल्या आहेत. वाहनचालकांना दूरवरूनच या सळाकी दिसतात. भीतीपोटी वाहन चालक वेग कमी करून पूल पार करतात. येथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
वर्दळीमुळे रस्ता नादुरुस्तप्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या ९.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे रस्त्याची दुर्दंशा झालेली आहे. रस्त्याचे काम करताना गुणवत्ता नियंत्रण तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नागपूर यांच्या माध्यमातून कामाचे कंत्राट देण्यात आले होते. विभागाला त्याचवेळी कामाच्या खर्चात वाढ करण्यास सांगितले होते. परंतु ६ कोटीत डांबराचा एक थर टाकण्याचा कंत्राट देण्यात आला होता. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता उखडला आहे.- श्रीनिवास, मे. गौरी कन्स्ट्रक्शन नागपूर