नागपूर : महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे आहोत. लोकसभेतही आमची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागवतो. आता काँग्रेसनेही मोठेपणा दाखवावा. महाविकास आघाडीची सत्ता ही शरद पवार यांच्यामुळे आली हे विसरता कामा नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकी तयारी जोरात सुरू केली असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काल शनिवारी शिवसेनेमधील काही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. सावरबांधे यांनी त्यानंतर आपली कामाची गती वाढवत त्यांचे शिवसेनेतील समर्थक असलेले कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले.
अक्षय मंगल कार्यालय, नंदनवन येथे शनिवारी आयोजित मेळाव्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री जांभुळे, महिला उपजिल्हा संघटिका नीलम उमाठे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे, शहर समन्वयक तुषार कोल्हे आदींनी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना पटेल म्हणाले, राज्यात परत भाजपची सत्ता आली तर आमचे काही खरे नाही, असे म्हणत काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीकडे आले. शेवटी शरद पवार यांनी पुढाकार घेत सत्ता स्थापन केली. नागपुरात आजवर आम्ही विधानसभा लढवली नाही, त्यामुळे थोडं मागे राहिलो. येत्या काळात विधानसभा लढवू, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.
यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, ईश्वर बाळबुधे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत पवार, अनिल अहिरकर, बजरंग सिंह परिहार, नगरसेविका आभा पांडे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले आदी उपस्थित होते.