नागपूर : उपमुख्यमंत्रीअजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटले होते. पण, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक सूचक विधान केले असून आज नाही पण कधी ना कधी अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
"आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतला. त्यामुळे आम्ही सगळे ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत. भारत जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर चांगलं आणि विकासशील सरकारची गरज आहे", असे पटेल यांनी म्हटले.
तसेच आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललं आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारधारा आणि एवढे सारे लोकांना एकत्रित आणि एकसंघ आणून देशाला चांगला विकल्प देणे ही सोपी गोष्ट नाही. देशाने अनेकवेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. त्यामध्ये १९७७ असो किंवा १९८९ की १९९६ असे अनेक प्रसंग आले. म्हणून एक चांगलं स्थिर सरकार असले पाहिजे. सरकारचा एक चेहरा असला पाहिजे. त्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. म्हणून आम्ही पण अनेक बाबींचा विचार करून एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार असे विचारले असता त्यांनी म्हटले, "आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? आज अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते."