लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असली तरी ते नागपुरात कायम चर्चेत असतात. बुधवारी महापालिकेच्या विशेष सभेत मुंढे यांच्या कार्यकाळात साहित्य खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. तर विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची सदस्यांनी प्रशंसा केली. परंतु सभागृहात आरोप झाल्याने सत्यता पडताळण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.
चौकशी समितीत महालेखाकार कार्यालयातील दोन वरिष्ठ लेखापरीक्षकांचा समावेश राहणार असून, समितीने महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मागील सभागृहात अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी कोविड काळातील साहित्य खरेदीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करून स्थगन प्रस्ताव आणला होता. यावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी विशेष सभा बोलावली होती. स्थगन मांडताना आभा पांडे म्हणाल्या, तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात खरेदी समिती बनविण्यात आली होती. परंतु काही साहित्याची खरेदी करताना समितीची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. अतिरिक्त आयुक्त व आरोग्य अधिकारी यांना अधिकार नसताना साहित्य खरेदीच्या बिलावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. थर्मामीटर खरेदीत अनियमितता झाली. एका कामाचे दोन बिल काढण्यात आले. याची चौकशी करण्यात यावी.
सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे म्हणाले, आरोप केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा भविष्यात प्रश्न निर्माण होतील. महापौरांना सभागृहाने समिती गठित करण्याचे अधिकार द्यावे. एक महिन्यात चौकशी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला जावा. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, सकृतदर्शनी खरेदीत अनियमितता दिसत आहे. हेतुपुरस्सर अनियमितता केली असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके म्हणाले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे काम प्रशंसनीय आहे. त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. परंतु आरोपातील सत्य पुढे आले पाहिजे. शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी आभा पांडे यांच्या आरोपाचे समर्थन करून चौकशीची मागणी केली. धर्मपाल मेश्राम म्हणाले, आभा पांडे सध्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय हेतूने आरोप केले आहेत. आरोप केले म्हणून चौकशी करणे योग्य ठरणार नाही. संदीप सहारे, मनोज सांगोळे, नितीन साठवणे, संदीप जाधव, नंदा जिचकार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
सदस्यांनी मते आयुक्तांकडे मांडावीत - महापौर
खरेदी व्यवहारासंदर्भात ज्या सदस्यांना या विषयाच्या अनुषंगाने आपले मत मांडायचे आहे त्यांनी आयुक्तांना सूचित करून समितीद्वारे निर्धारित तारखेला त्यांच्यापुढे जाऊन आपले मत मांडू शकतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
मुंढेंनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे केली
- स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर म्हणाले, मुंढे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या खरेदीत अनियमितता झाली. दस्तऐवजावरून हे स्पष्ट होते. त्यांच्या कार्यकाळात कर्मचारी दबावात होते. त्यांनी दबाव टाकून कामे करून घेतली. एकाच्या चुकीसाठी संपूर्ण प्रशासनाला दोषी धरता येणार नाही.
प्रशासनाने आरोप फेटाळले
आभा पांडे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना अधिकृत केले. जवळपास सव्वातासाच्या आपल्या वक्तव्यातून जोशी यांनी प्रत्येक आरोपाला पुराव्यानिशी उत्तर दिले. केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक खरेदी ही नियमानुसारच करण्यात आली. जी माहिती मागितली ती पांडे यांना देण्यात आली. माहिती देण्याला थोडा विलंब होऊ शकतो. तसेही जी खरेदी करण्यात आली, त्याचे ऑडिट होते. कुठेही अनियमितता नसल्याचे जोशी म्हणाले.
व्यवहारात पारदर्शकता, चौकशीची गरज नाही - आयुक्त
आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, प्रशासनातर्फे आभा पांडे यांना लेखी स्वरूपात सविस्तर उत्तरे देण्यात आलेली आहेत. यात स्पष्टता आहे. प्रशासनाच्या कामकाजात कुठेही अनियमितता झालेली नाही. प्रश्न औषधी व सामुग्रीचा आहे. याचे दर वेळोवेळी बदलत असतात. नियमानुसार खरेदी करण्यात आलेली आहे. खरेदीचे ऑडिट होत असते. त्यामुळे चौकशीची गरज नाही. सभागृहाची समिती गठित करून त्यांचा किमती वेळ वाया घालवू नका, असे आयुक्त म्हणाले.