नागपूर : नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी रात्री जारी करण्यात आले.
प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची २२ जून २०२१ रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी त्या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. प्राजक्ता लवंगारे-वर्मा या अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. विभागीय आयुक्तपदाच्या अतिशय कमी कालावधीतही त्यांनी आपली विशेष अशी छाप सोडली आहे. त्यांनी विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा नागपुरातच नव्हे, तर विभागातच कोरोनाचे संक्रमण होते. कोरोना काळात त्यांनी विभागाचे सक्षमपणे नेतृत्व केले. बंद असलेले ऑक्सिजन प्लांट सुरू केले. सिरो सर्व्हे केला. शासकीय शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विभागीय स्तरावर होणारी महसूल बैठक त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यावर भर दिला. प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तेथील रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना सात-बारा घरपोच मिळावा यासाठी त्यांनी विशेष अभियान राबविले. तब्बल २५ लाख शेतकऱ्यांना मोफत घरपोच सातबारा उपलब्ध करून देण्यात आला. इतकेच नव्हे, नागपुरातील शांतिवन चिचोली येथील प्रकल्प जवळपास पूर्ण होत आल्यानंतर थोड्याशा निधीमुळे प्रकल्प रखडला होता. प्राजक्ता लवंगारे यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने निधी मंजूर केला. गाव-वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे हटवून त्याठिकाणी महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याच्या अंमलबजावणीसाठी प्राजक्ता वर्मा यांनी विशेष पुढाकार घेतला.