नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून मलिक यांच्यावर जोरदार टीका केली.
प्रकाश आंबेडकर आज नागपूरमध्ये होते, यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. संघाचे आणि राष्ट्रवादीचे संबंध सर्वांनाच ठाऊक आहेत. संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे, मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी ओबीसींना राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली असून सरकारला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे म्हटले. आज ओबीसी आरक्षण गेलं, जर वेळेत राज्य सकारने इम्पेरिकल डेटा गोळा करून दिला नाही तर उद्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओबीसी आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. व आता ओबीसींनी याबाबत ठिकठिकाणी मेळावे घेऊन जनजागृती करण्याची गरज असून ओबीसी समाजानी स्वतःची लढाई स्वतः लढली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.