नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेल्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन नाराजी असल्याचे दाखवत एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एमआयएमच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांसोबत नाही, तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आहे. ते स्वत: याबाबत काही बोलत नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीतर्फे रविवारी नागपुरातील संविधान चौक येथून सत्ता संपादन रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्रकाश आंबेडकरांनी हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी, त्यांनी उपस्थित पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांसोबत नाही, तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. ओवेसी स्वत: याबाबत काही बोलत नाहीत, तोपर्यंत युती कायम आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
याचबरोबर, प्रकाश आंबेडकर यांनी गड-किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या धोरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारकडे विकायला काहीच नाही, त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले विकायला निघाले आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच, त्यांनी हे सरकार आरक्षण विरोधी असल्याचे सांगत टीकाही केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे.
(एमआयएम स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक, वंबआ फुटली!)
गेल्या शुक्रवारी इम्तियाज जलील यांनी पत्रक काढून आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे, या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे एमआयएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांची आणि प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपाबाबत बैठक झाली, शेवटची बैठक 5 सप्टेंबरला झाली. प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना मेल लिहून 8 जागा देत असल्याचे सांगितले. पण, एमआयएमने 2014 ला 24 जागा लढवल्या, ज्यापैकी दोन ठिकाणी विजय मिळवला आणि आम्ही नऊ जागांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होतो. एमआयएमचे आज राज्यभरात दीडशेपेक्षा जास्त नगरसेवक आहेत, असेही एमआयएमच्या या पत्रकात म्हटले आहे.