नागपूर : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रा. प्रमोद रामटेके यांचा विख्यात चित्रकार म्हणून राज्याचे प्रधान शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, मानपदक आणि लाखाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे हा समारंभ पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान ६२वे महाराष्ट्र राज्य वार्षिक कला प्रदर्शनातील ‘राज्य पारितोषिक’ विजेत्या कलावंतांना राज्याचे कला संचालक प्रधान सचिव राजीव मिश्रा, प्रा. प्रमोद रामटेके, पद्मश्री सुधाकर ओलवे आणि शिल्पकार राम सुतार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कलावंतांची खरी संपत्ती ही त्याची निर्मिती असते. तसेच ती राज्याची, देशाची व जगाचीही असते. परंतु प्रत्येक प्रसिद्ध कलावंत त्याच्या कलाकृतींची निगा राखण्यास संपन्न असतोच असे नाही. पर्यायाने या अमूल्य कलाकृती नष्ट होतात. हे कलावैभव जपण्यास, राज्यात आधुनिक कला संग्रहालय निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत रामटेके यांनी यावेळी व्यक्त केले.