प्रमोद येवले नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:19 PM2018-10-10T21:19:53+5:302018-10-10T21:22:44+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे.
उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालकांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये डॉ. येवले यांच्याकडे विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या निकषानुसार आवश्यक पात्रता नसल्याचे नमूद करण्यात आले होते. कुलपतींनी त्याची दखल घेऊन विद्यापीठाकडून येवले यांच्या पात्रतेसंदर्भात अहवाल मागवायला हवा होता. परंतु, तसे करण्यात आले नाही. त्यामुळे २८ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ९(३)(बी) अंतर्गत कुलपतींकडे आवश्यक कागदपत्रांसह याचिका दाखल केली. कुलपतींनी त्यावरही काहीच कार्यवाही केली नाही. येवले हे विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. परिणामी, या मुद्यावर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. कुलपतींना त्यांच्याकडे प्रलंबित याचिकेवर निर्णय घेण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्यात यावा किंवा ही याचिका मंजूर करून येवले यांना प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे, येवले यांची प्र-कुलगुरू पदावरील नियुक्ती रद्द करण्यात यावी आणि या कार्यकाळात त्यांना अदा करण्यात आलेले वेतन व अन्य फायदे वसूल करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.
कुलपती, कुलसचिव यांना नोटीस
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर विद्यापीठाचे कुलपती, कुलसचिव व डॉ. प्रमोद येवले यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.